Tuesday, January 26, 2016

दिवाळी अंक- रानमेवा

दिवाळी आली कि सर्वांना वेध लागतात ते फटाके, फराळ, नवे कपडे, मोती साबणाचे अभ्यंग स्नान... इत्यादी गोष्टींचे. मला मात्र वेध लागलेले असतात ते दिवाळी अंकांचे. माझे वडील दिवाळीत हे अंक घेऊन यायचे. त्यांना प्रेमाने कव्हर घालायचे आणि मग आम्हाला वाचायला द्यायचे. त्यांची हि नियमितता आम्हालाही एक सवय लावून गेली. दिवाळी अंक वाचायची. त्यांचा आस्वाद घेण्याची.

धनंजय, चंद्रकांत, मौज, जत्रा, मेनका, माहेर, शतायुषी, छावा, मोहिनी, सत्याग्रही, किशोर, ग्रहांकित, भाग्यसंकेत, ग्राहकहित, उत्तम कथा, ऋतुरंग, अंतर्नाद, छंद, आवाज, दीपावली, दीर्घायू, दिवाळी फराळ, हंस, नवलकथा, गंधाली अशी एक ना अनेक विषयांवरचे दिवाळी अंक बाजारात येतात आणि माझी पावले दुकानाकडे वळतात.


अप्पा बळवंत चौक. या ठिकाणी गेलं कि लक्षवेधून घेतात ते दुकानाबाहेरील मोठ-मोठे जाहिरात फलक. विविध दिवाळी अंकांच्या जाहिराती. काही संच विकत घेतल्यास १० ते २० टक्के सवलत. मी आपसूक या दुकानाकडे ओढला जातो आणि अंक चाळण्यास सुरुवात करतो. थोड्याच वेळात माझ्या हातातल्या अंकांचे वजन वाढते आणि दुकानदार स्वतः पुढे येऊन मदत करायला लागतो. मोठ गिऱ्हाईक आलं हि भावना त्याच्या मनात आणि वा काय छान वाटतंय सगळ्यांसमोर स्वतः दुकानदार आपलं ओझ घेऊन उभा आहे हि भावना माझ्या मनात. दोघेही खुश.


या दिवाळी अंकात असे असते तरी काय? यात असतात उद्याचे काही नवोन्मेश असलेले लेखक आणि आजचे मातब्बर यांची जुगलबंदी. काही कालच्या आजच्या समस्यांवर लिहिणारे काही निखळ मनोरंजन करणारे काही सामाजिक भान असलेले तर काही घाबरवून टाकणाऱ्या रहस्यमय गंभीर कथा कादंबऱ्या लिहिणारे. काहींच्या हलक्या फुलक्या कविता तर काहींचे विनोद. सगळ्यांची उठाठेव एकाच गोष्टीसाठी ती म्हणजे व्यक्त होण्यासाठी मिळणारे व्यासपीठ. मोठ्या लेखकांना या छोट्या व्यासपीठाची गरज असते ती नवीन वाचक मिळण्यासाठी आणि काही वेळेस त्यांच्या अप्रकाशित साहित्याला दाम मिळवून देण्यासाठी. छोटे नवोदित लेखक शोधात असतात ते या माध्यमातून मिळणाऱ्या बिदागीच्या आणि वाचक वर्गाच्या. पण काही असेही लेखक आहेत जे अपवाद आहेत या दोन्हीला. हे लेखक फक्त मासिक अथवा दिवाळी अंकांसाठीच लिहित असतात. त्यांना दाम आणि वाचक दोन्हीपेक्षा समाधान हवे असते. आपले लेखन मासिकामध्ये छापून येणे हेच त्यांच्यासाठी महत्वाचे असते. हे म्हणजे साहित्याचा रानमेवा असल्यासारखे आहे. एखादे फळ आंबट, एखादे तुरट, गोड, कडू. पण प्रत्येकामध्ये एक उर्जा. एक व्हिटामिन. मनाला उभारी देणारी, आनंद देणारी प्रेरणा.


माझी खरेदी झाल्यावर दुकानदार स्वतः नवीन वर्षाची दिनदर्शिका किंवा एखादे पॉकेट प्लॅनर माझ्या हातात ठेवतो आणि पुन्हा या असे आर्जवी निमंत्रण देतो. आपण कोणीतरी खूप मोठे असल्याचे उगाच वाटते आणि मी बाहेर पडतो.


घरी आलो कि प्रत्येक अंकात काय दडलय हे पाहिल्याशिवाय मला झोप लागत नाही. मग चालू होतो तो दिनक्रम. पण यातही मी रोज एक तरी कथा वाचायचा नियम पाळतो आणि पुढचे काही महिने मी याच साहित्याच्या रानमेव्यावर जगतो. पुढच्या दिवाळी पर्यंत. पुढच्या रानमेव्यावर ताव मारण्यासाठी पुन्हा तयार.