Monday, November 16, 2009

जाऊदे...

गेले दोन दिवस धो धो पाउस कोसळतोय जसे काही वरुणराजाला कोणाचीच काही पर्वा नाहीये. तसे पहिले तर हा काही पावसाळा नाही. नोव्हेंबर महिन्यात पाउस तसा तुरळकच पडलेला मी तरी पहिला आहे. बहुदा पडतच नसावा. लहानपणापासून हेच मनावर कोरले गेले आहे कि दिवाळी आली म्हणजे पावसाळा संपून थंडी हळू हळू कानोसा घेत आपल्याकडे येते आहे. संधी मिळताच ती आपला विळखा घट्ट करते आणि मग सगळ्यांना गरज भासते ती उबेची.
उब. काय अजब खेळ आहे निसर्गाचा. थंडीत जी उब हवी हवीशी वाटते तीच उब उन्हाळ्यात नकोशी होते. पण मायेची उब मात्र सर्वाना आयुष्यभर हवी असते. काहीना ती मिळते तर काहीजण अंगावर मऊ चादर घेऊन त्यातच समाधान मानतात. पण सगळ्यांना मिळते का हि उब?
अचानक मला एक जोडपे आठवतेय आणि त्यांचा विचार मला स्वस्थ बसू देत नाहीये. गेली दोन-तीन वर्षे मी त्यांना जवळ जवळ रोज पाहतो. ऑफिस मधून घरी जाताना. अलंकार पोलीस चौकी जवळच्या पुलाच्या कोपऱ्यावर त्यांचा संसार त्यांनी थाटला आहे.
मला जेव्हा ऑफिस मधून घरी जायला उशीर होतो बारा - साडेबारा वाजून गेलेले असतात तेव्हा हे दोघे जगातील सर्व चिंता बाजूला ठेवून शांतपणे झोपलेले असतात. तर कधी आठ - नऊ वाजता ते दोघे त्यांच्या जागेवर बसून रस्त्यावरील रहदारीकडे पाहत बसलेले असतात. काय शोधत असतात कोण जाणे. पण मला त्यांच्या बद्दल नेहमी कुतूहल वाटते. काय काम करीत असतील हे दोघे? काय खात असतील? कोणी यांना त्रास तर देत नसेल ना? असे अनेक प्रश्न मनाला पडतात.
आता-आत्ता मला त्यांची आठवण सारखी येण्याचे कारण म्हणजे, कालही मी त्या तुफान पावसात गाडीवरून येत होतो. पण नेहमीप्रमाणे माझे लक्ष त्या दोघांकडे गेले नाही. पाऊसच एवढा होता कि समोरचे नीट दिसत नव्हते आणि त्यामुळे इकडे तिकडे बघणे शक्यच नव्हते. पण आज मात्र तिथून येताना मला ते दोघे दिसले. तिथेच नेहमीच्या जागी. आजूबाजूचा फुटपाथ, रस्ता, झाडे, पाने सर्व काही कालच्या पावसाने झोडपून काढले होते, इतके कि त्यांची मरगळ अजून गेली नव्हती कि ओलसरपणा कमी झाला नव्हता. आणि चटकन एक विचार मनात आला अरे या पावसाने काही काही सोडले नाही जे दिसले तावडीत सापडले ते सगळे झोडपून काढले मग तेव्हा या दोघांनी काय केले असेल? कुठे गेले असतील? त्यांना आसरा मिळाला असेल का? कि त्याच पावसात भिजत ते तिथेच बसले असतील? असंख्य प्रश्नांनी माझे मन भरून गेले. हजारदा वाटले कि जावे त्यांना विचारावे बाबांनो कुठून आलात, गाव कोणत, तुम्ही काय करता, काल काय केले.............
पण.......... हा पण फार वाईट असतो. कारण हा पणच आपल्या मेंदूला पळवाटा शोधून देतो आणि मग मनाचे काही चालू देत नाही. माझेही नेहमी प्रमाणे तसेच झाले. विचारूया पण कसे, पण कसे, पण कसे ..... असा विचार करता करताच मेंदूने सुचविले कि "जाऊदे". नेहमी प्रमाणे मी पुन्हा शांत बसलो. माहित नाही का पण मेंदूने दिलेला "जाऊदे " चा पर्याय मनाने स्वीकारला होता.

1 comment:

  1. सुंदर!
    उत्तम!!
    अप्रतिम!!!
    काळजाला भिडणारे!!!!

    ReplyDelete

Your comments are valuable for me. Thank you for posting it.