Tuesday, June 16, 2020

पालखी

आजच पालखीचे पुण्यात आगमन झाले असते आणि उद्याचा मुक्काम.

मी दर वर्षी, पालखीचे दर्शन घ्यायला फर्ग्युसन रस्त्यावर जातो. लहापणापासूनच तिथे पालखीचे दर्शन घेतले आहे. तुकाराम महाराज पादुका मंदिरासमोर, ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिरासमोर आणि शेतकी महाविद्यालय चौक. या भागात प्रचंड उत्साह असतो.

शेतकी महाविद्यालय, मॉडर्न कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, बी एम सी सी, मराठवाडा, सिंबायोसिस, या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक असा वर्ग, आणि वडार वाडी, गोखले नगर, पोलीस लाईन, आपटे रोड मॉडेल कॉलनी, अशा भागातला गरीब, उच्चभ्रू वर्ग, सगळे वेगवेगळ्या रंगाचे, रूपाचे, वर्णाचे, जाती धर्माचे तिथे एकत्र येतात.

माझा भाचासुद्धा ३ वर्षाचा असल्यापासून माझ्याबरोबर येतो. आता ६ वर्षाचा आहे.
मी स्वतः ६ वर्षाचा होतो तेव्हापासून पालखीचं दर्शन घेतले आहे.

मागील ३४-३५ वर्षातले हे पहिले वर्ष आहे जेव्हा हा सोहळाच  अनुभवता येणार नाही. घरीच असलो तरी, मन फर्ग्युसन रोड वर आहे. कुठून भीमसेनजींचा आवाज येतोय का ते शोधत आहे. कारण पालखी आणि भीमसेनजींची अभंगवाणी हि खरच अभंग आहे.

उद्या आपल्या सर्वांबरोबरच, पुण्यातील आणि परिसरातील वृत्तपत्राचे कागद, शाई, मशीन सगळेच पालखीची बातमी आणि फोटो यांची वाट पाहत असतील. उद्या त्यांची पाने कोरीच असतील. इतर बातम्या असल्या तरी पालखीची बातमी मात्र हरवलेली असेल. त्यामुळे ती कोरीच नाही का?

पुढच्या दोन दिवसांचे अबाल वृद्धांचे पालखी बरोबरचे, डोक्यावरच्या तुळशीचे, कपाळावर चंदन लावलेले हसरे चेहरे यावर्षी आपापल्या घरीच असतील.

- मोहिनीराज भावे
१६-०६-२०२०

No comments:

Post a Comment

Your comments are valuable for me. Thank you for posting it.