बऱ्याचदा आपल्या जीवनात असं काही होत असतं कि आपल्यालाच कळत नसतं कि हे असं का घडलं. आपले काही मित्रं आपल्यापासून दुरावतात. काही छोटे गैरसमज असतात तर काही मोठे. पण शेवटी सगळे गैरसमजच असतात. आपण एकमेकांशी नं बोलल्याने गैरसमज वाढत जाऊन मैत्री तुटते.
माझेही असेच काही मित्रं आहेत जे दुरावले आहेत. त्यानंतर अजूनही आमच्यात सुसंवाद झालेला नाही. त्याचे कारण दोन्हीकडून तसा प्रयत्न कोणीच केला नाही. मीही समोरची व्यक्ती बोलेल किंवा समोरच्या व्यक्तीनेच सुरुवात करावी या अपेक्षेने बोललो नाही. आणि समोरच्या व्यक्तीनेही तोच विचार केला असावा. आणि आमच्यात सुसंवाद घडावा यासाठी इतरही कोणी प्रयत्न केले नाही.
खरतरं दुसऱ्या कोणी आमच्यात सुसंवाद व्हावा म्हणून प्रयत्न करण्यापेक्षा आम्हीच एकमेकांशी बोलून सगळे प्रश्न सुटले असते पण आमच्यातला अहंकार आडवा आला. माझ्यातला तर नक्कीच आला. मला सतत आसच वाटलं कि माझी काहीच चूक नाहीये मग मी का बोलू? पण माझ्या हे लक्षातच नाही आलं नाही कि आपली चूक नाहीये हे समोरच्याला कळण्यासाठी तरी आपल्याला त्याच्याशी बोलायला हवं. बोलण्याची गरज वाटत नाही त्या वेळेस मैत्री एकतर एकदम घट्ट झालेली असते किंवा तुटलेली असते.
आज मागे वळून बघताना खूप वाईट वाटत. कारण मी कायम मानत आलोय कि नातेवाईक असण्यापेक्षा मित्रं असणं अनेक पटींनी चांगलं. कारण मित्रं कायम भावनेने बांधलेले असतात तर नातेवाईक हे रक्ताने. आपण कोणाला मित्रं मानलं तर त्यामागे काही भावना असतात. आपण एकमेकांबरोबर काही जिव्हाळ्याचे, आनंदाचे क्षण घालवलेले असतात. काही दुःखे सांगितलेली असतात. हे मित्रं असतात तरी कोण? तर ते असतात आपले सहकारी. सहकारी मग कोणतेही असोत, शाळेतले, कॉलेजमधले, क्रिकेटच्या ग्राउंडवरचे, जिममधले किंवा ऑफिसमधले. अशा मित्रांपासून दुरावणं मनाला यातना देऊन जातं.
तुटलेली मैत्री जर मुलाशी असेल तर ती जोडताना फारसा प्रोब्लेम येत नाही आणि तसा माझा अनुभवपण आहे. त्याला आपण चार शिव्या देऊन बोलता करू शकतो. पण मैत्री जर एखादया मुलीशी तुटलेली असेल तर फार अवघड जातं. मला तर नक्कीच हे जगातलं सगळ्यात अवघड काम वाटतं. कारण मुलींशी मुळात बोलतानाच मी खूप संकोचून बोलत असतो. आणि समजा अश्या एखादया मुलीशी आपण बोलायला गेलो आणि तिचा गैरसमज झाला कि आपण तिच्यावर लाईन मारतोय तर काय करावं? एकवेळ तिला ते चांगलं वाटलं किंवा तिने ते लाईटली घेतलं तर ठीक पण जर तिला त्याचा रागच आला तर मग पुन्हा मैत्री होणेही दुरापास्त. आणि मुलींच्या बाबतीत नेमकं आसच होतं. वर परत ती हि गोष्ट स्वतापाशीच ठेवेल कि नाही हेही माहित नसतं. म्हणजे आधीच तिचा गैरसमज आणि तो ती सगळ्यांना सांगत सुटणार.
माझ्या लिस्टमध्ये मुलेहि आहेत आणि मुलीही. मुलांशी मी सुरुवात करून बघेनही पण मुलींच्या बाबतीत काय? असा हा मैत्रीचा यक्ष प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. उत्तरं मलाच शोधावे लागेल पण माहित नाही कधी सापडेल.