Wednesday, November 20, 2019

Project Management : Part-05: Project Requirement


मित्रांनो समजा आपण एखादा मोठा ग्रुप घेऊन फिरायला निघालो आहोत. मग आपण काय करतो तर ज्या ठिकाणी जायचे आहे त्याठिकाणची सगळी माहिती नोंद करून ठेवतो. त्याचबरोबर प्रवासाला लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करणारी एक लिस्ट तयार करतो. या लिस्टमध्ये प्रवासाची तिकिटे, राहण्याच्या ठिकाणाचे बुकिंग केले असेल किंवा करायचे असेल तर त्याची नोंद, कधी, कोणत्या दिवशी, किती वाजता, कुठे जायचे, तिथे काय बघायचे, याची जुजबी नोंद. तसेच निघताना आपल्या ग्रुपमधील कोणती व्यक्ती कशी पोहोचेल आणि सगळ्यांचा एकच पिकअप पॉइंट कोणता असेल या सर्व गोष्टींची नोंद आपण करतोच. त्याचबरोबर आपण प्रवासामध्ये लागणाऱ्या महत्त्वाच्या सामानाची यादीदेखील करतो. जर आपण अशाप्रकारे कोणतीही तयारी न करता प्रवास सुरू केला तर आपल्याला काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

अगदी अशाच प्रकारे एखादे प्रोजेक्ट सुरू करताना त्या प्रोजेक्टमध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टींची यादी तयार करणे म्हणजे प्रोजेक्ट रिक्वायरमेंट.

आता हेच बघा ना एखादे प्रोजेक्ट सुरू करायचे असेल तर, क्लायंटला नक्की काय हवे आहे याच्या नोंदी करून घेणे, क्लायंट हे प्रोजेक्ट कोणासाठी करत आहे म्हणजे टारगेट ऑडियन्स कोण आहे याची नोंद करून घेणे, टारगेट ऑडियन्स च्या गरजा समजून घेणे आणि त्यांच्या नोंदी करणे, आपल्या प्रोजेक्टमधून आपल्याला काय साध्य करायचे आहे याची नोंद करणे म्हणजे आपल्या प्रोजेक्टचा गोल काय आहे हे नोंद करून ठेवणे, तसेच या रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचे मनुष्यबळ लागेल त्यांची कुशलता काय असेल, त्यासाठी कोणत्या प्रकारचे हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर लागेल, ते कधी लागेल याच्या नोंदी करणे हे हितकारक असते यामुळे आपण प्रोजेक्टच्या मध्ये येणाऱ्या सर्व बाबींचा योग्य तो विचार करतो आणि त्याप्रमाणे तयार होऊनच आपल्या प्रोजेक्टच्या प्रवासाला सुरुवात करतो. 

Sunday, November 10, 2019

Project Management : Part-04: Cone of Uncertainty- Project Stakeholders

प्रोजेक्ट स्टेकहोल्डर्स म्हणजे प्रत्येक ज्यांना प्रोजेक्ट मध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे अशा व्यक्ती. कोणत्याही प्रोजेक्टमध्ये अशी अधिकारी व्यक्ती खूप महत्वाची असते. अशी व्यक्ती फक्त क्लाएंट असते असे नाही तर ती तुमच्या कंपनीची एखादी उच्च पदावरील व्यक्ती असेल अथवा प्रोजेक्ट साठी काम करणारी एखादी कन्सल्टन्ट अथवा अन्य कोणी. हि एक व्यक्ती किंवा अशा अनेक व्यक्ती तुम्ही संचालित करत असलेल्या प्रोजेक्ट संबंधित अनेक महत्वाचे निर्णय घेणार असते जसे कि;
१. रिक्वायरमेंट
२. टाइमलाईन
३. कामाचे स्वरूप
४. कॉस्ट
५. मनुष्यबळ
६. तुम्ही केलेले काम योग्य आहे कि अयोग्य

आता अशा अनेक व्यक्ती असतात तेव्हा "व्यक्ती तितक्या प्रवृत्ती" हा अनुभव तुम्ही घेऊ शकाल. या सर्व व्यक्ती आणि त्यांची मते जाणून घेऊन काम करणे हे जितके महत्वाचे तितकेच महत्वाचे कोणत्या व्यक्तीस कोणत्या प्रकारचा सर्वोच्च अधिकार आहे हे माहित करून घेणे.

समजा तुमच्या घरी पार्टी आहे आणि पाहुण्यांसाठी तुम्ही एखादा पदार्थ बनवला आणि तो घरातील ४ व्यक्तींना खायला दिला तर जशी तुम्हाला वेगवेगळी प्रतिक्रिया मिळेल जसे कि गोड पदार्थ असेल तर खूपच गोड आहे  (डाएट करणारी व्यक्ती ) किंवा थोडी साखर अजून हवी होती (डाएट न करणारी व्यक्ती ) अशा दोन विरुद्ध प्रतिक्रिया तुम्हाला मिळू शकतात. यातील कोणाची प्रतिक्रिया तुम्ही फायनल धराल? ज्या व्यक्तीला स्वयंपाकातील जास्त कळते तिला. बरोबर ना? अगदी तसेच हे आहे.


तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट नेहमी तयार राहील हे तुम्ही पाहिलं पाहिजे. कोणत्याही व्यक्तीने प्रोजेक्ट संदर्भात प्रश्न विचारला तर तुम्ही हा रिपोर्ट बघून लगेच उत्तर देऊ शकाल. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी काही ऍप्लिकेशन्स तुम्ही वापरू शकता (Microsoft Project, Asana, Teamwork, ProofHub, Jira, Trello, etc)

प्रोजेक्टचे स्टेटस नेहमी अपडेट करा आणि सगळ्यांबरोबर विशिष्ठ कालावधीनंतर शेअर करीत रहा. तुम्ही स्वतः स्टेटस शेअर केल्याने तुम्हाला तुमची कार्यक्षमता वेगळी सिद्ध करण्याची गरज पडणार नाही. अशाप्रकारे तुम्ही प्रोजेक्टमध्ये काही संकटे आली तर आधीच त्यांचा प्रतिकार करण्यास सगळ्यांना बरोबर घेऊन मार्ग काढू शकाल. 

Monday, November 4, 2019

Project Management: Part-03: Uncertainty

मित्रांनो, कोणत्याही प्रोजेक्टच्या आधी त्या प्रोजेक्टबद्दल खूप कमी माहिती असते. म्हणजे;
१. प्रोजेक्ट स्टेकहोल्डर्स (Project Stakeholders)
२. प्रोजेक्ट रिक्वायरमेंट (Project Requirement)
३. प्रोजेक्ट टाइमलाईन (Project Timeline)
४. प्रोजेक्ट टीम (Project Team)
५. प्रोजेक्टमधील चॅलेंजेस (Challenges in Project)
६. प्रोजेक्टमधील चॅलेंजेसची सोल्युशन्स (Solutions of Challenges)

आता एवढ्या सगळ्या गोष्टी एकाच वेळी माहित होणं अवघड आहे. कधी प्रोजेक्ट संपत आल्यावर स्टेकहोल्डर्स नक्की कोण हे समजते तर कधी त्यांची संख्या जास्त असते. प्रत्येकाचे मन सांभाळणे अवघड गोष्ट आहे. कारण "मन" हे कोणत्याही तराजूमध्ये तोलता येत नाही कि अग्रीमेंटमध्ये बांधून ठेवता येत नाही.

सगळ्यात क्लिष्ट असते ते म्हणजे क्लिअर रिक्वायरमेंट प्राप्त होणे. अनेकदा क्लाएंटला काय हवे आहे हे त्यांना स्वतःलाच माहित नसते तर कधी ते आपल्याला नीट कळत नसते. यामध्ये महत्वाचे असते ते म्हणजे संवाद आणि संवादाची भाषा. भाषा म्हणजे इंग्रजी, फ्रेंच वगैरे नव्हे तर आपली तांत्रिक (technical) आणि त्यांची अतांत्रिक (non -technical).

टाइमलाईन तर अशी गोष्ट आहे जी क्लाएंट आणि आपली कधीच जुळत नसते. एखादे प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने चालू आहे असा अहवाल आपण दिला रे दिला कि क्लाएंट ते लवकर पूर्ण करायला सांगतो. एखादा प्रोजेक्ट काही अडचणीतून जात असेल तर क्लाएंट वेळेच्या बंधनाची आठवण करून देतो. एखाद्या प्रोजेक्ट मध्ये क्लाएंट कडून काही गोष्टींची पूर्तता व्हायची असेल तर टाइमलाईन बदलून वेळ वाढवून मिळतो. टाइमलाईन न जुळण्याची असंख्य करणे असतात.

प्रोजेक्ट टीम हा विषय नाजूक असतो. प्रोजेक्ट रिक्वायरमेंट नीट माहित नसल्यास टीम काय असायला पाहिजे हे ठरवता येत नाही. टीम काय हवी हे कळले तर ती उपलब्ध नसते. उपलब्ध असल्यास कोणाला सुट्टी हवी असते तर कोणाला ट्रेंनिंग. टाइमलाईन आणि टीमचे एक वेगळेच नाते असते. जो प्लॅन आपण टीमला विचारून करतो तो योग्य रीतीने पुढे न जाण्यास अनेक अचानक गोष्टी घडतात तर जो प्लॅन आपण स्वतः करतो त्यात अडचण काही असू, आपण तो न विचारता केला हे एकमेव कारण असते.

प्रोजेक्ट मधील चॅलेंजेस आणि त्यांची सोल्युशन्स हे आपण गृहीत धरल्यापेक्षा काहीतरी वेगळेच रसायन असते.
आणि या सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण स्वतः. आपण स्वतः च  जर नीट प्लॅन करून ते पूर्ण करून घेऊ शकत नसलो तर इतरांना दोष तो काय द्यायचा?

या सगळ्या माहित नसलेल्या किंवा कमी माहित असलेल्या गोष्टी म्हणजे अनसर्टनीटी (Uncertainty).