Sunday, January 20, 2013

प्रकाश


प्रकाश बसला होता तिथून समोर सगळीकडे राख पसरली होती. प्रकाशच्या चेहऱ्यावर एकप्रकारची निराशा व्यापली होती. सकाळपासूनच तो इथे येऊन बसला होता. दुपारच्या रणरणत्या उन्हात सुद्धा त्याला कोणतीच जाणीव नव्हती. तहान भूक सगळं काही तो विसरून गेला होता. म्हातारा बाप आपल्या शोधात फिरत असेल, त्यान आपला लहानपणापासूनचा मित्र सदाला त्याच्या पानाच्या दुकानावर जाऊन आपल्याबद्दल विचारलं असेल “बा सदा, परकाश्ला कुट पाहिलं गा?”, बा नं लहानग्या कृष्णाला आपल्याला शोधायला पाठवलं असेल, आणि शोधून शोधून थकून शेवटी घरातल्या सगळ्यांनी थोडंस भूकेपोटी खाऊन घेतलं असेल, यापैकी कोणतीच गोष्ट त्याच्या मनाला भेडसावत नव्हती. आता दुपारचे चार-साडेचार होत आले होते. त्याच्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा ओघळून आता वाळल्या होत्या. त्याचा काळसर चेहरा पूर्ण निस्तेज झाला होता. डोळे तीन चार दिवस झोपही न झाल्याची साक्ष देत होते. तीस वर्षाचा प्रकाश आता चाळीस-पंचेचाळीसचा भासत होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याच भावना प्रकट होत नव्हत्या. जसे काही जगातील सर्व भाव भावना मृत पावल्या आहेत असंच वाटत होत त्याच्या चेहऱ्यावरून. त्याच्या त्या निश्चल आकृतीकडे पाहून जणू काही वाराही त्या ठिकाणी निश्चल झाला होता. आजूबाजूची झाडे ज्यांनी त्याला लहानाचा मोठा होताना पाहिलं होता तीही निश्चल होती. आजूबाजूला कोणतीच हालचाल नव्हती. प्रकाशच्या डोक्यातले विचारच जणू त्यांना कळले होते. अचानक या सर्व स्तब्ध वातावरणाला छेद देत प्रकाश उठला. तो ज्या वेगाने उठला तेवढ्याच वेगाने चालत निघाला. त्याने त्याच्याच मनाशी काहीतरी घट्ट विणलं होता. त्याचा विचार पक्का झाला होता. त्याचा प्रत्येक अवयव त्याच्या निर्णयाशी बांधील असल्याची प्रतिज्ञा केल्यागतं त्याच्यासमवेत चालत असल्याचे भासत होते.



प्रकाश त्याच्या बा चा एकुलता एक मुलगा. त्याच्या बा नं लहानपणापासूनच त्याच्यावर चांगले संस्कार केले होते. गरिबी असली तरी मनानी श्रीमंत राहायला शिकवलं होत. दुसऱ्यांना मदत करायला शिकवलं होत. त्याच्या बा लाही त्याच खूप कौतुक होत. तो जे मागेल त्यापैकी जे शक्य होईल ते सर्व त्याचा बा त्याला आणून देत असे. त्याच्या बा ची
एकाच इच्छा होती प्रकाश नी शिकून खूप मोठ्ठं व्हावं. आभाळा एवढं. प्रकाशही तसा हुशार होता. शाळा सुटल्यावर इतर मुलांसारखा तो गावभर उनाडक्या करत फिरत नसे. त्याच्या बा ला शेतावर जाऊन मदत करत असे. त्याला मित्रही फार नव्हते. एकच काय तो सदा. रोज संध्याकाळी ते दोघं गावच्या मंदिराजवळच्या मैदानात खेळत असत. मग सात
वाजता मंदिरात कीर्तन ऐकायला जात. आणि आपापल्या घरी परतत. घरी आल्यावर प्रकाश त्याच्या आईला मंदिरात त्या दिवशी बुवांनी काय सांगितलं ते सांगत असे. आणि जेवून बा बरोबर बाहेरच्या बाजल्यावर आकाशातले तारे न्याहाळत झोपत असे.



प्रकाश चांगला ग्रज्युएट झाला. त्याच्या बा ची इच्छा होती कि त्याने इंजिनिअर व्हावं. पण पहिल्या वर्षी शेतकी महाविद्यालयात शिकत असतानाच वर खर्चाला आधार म्हणून प्रकाश प्रोफेसर जोशी म्हणजे कृषी संशोधन क्षेत्रातलं एक नामवंत व्यक्तिमत्व. साधारण सत्तरीला आलेले. तरुणपणात अनेक मोठ-मोठ्या कृषी परिषदा- संमेलने देशात आणि परदेशांत गाजवलेले प्रोफेसर जोशी अतिशय साधे होते. पण मोठ-मोठ्या राजकीय पुढारी, संशोधक, विचारवंत यांच्यात त्यांना खूप आदर होता. त्याच कारणही तसच होत. ते म्हणजे त्यांनी कृषी क्षेत्रात केलेले बहुमोल योगदान. अनेक शोध लावून त्यातील एकावरही हक्क न सांगता सगळे संशोधन सर्वांना खुल करताना त्यांना असं एकदाही वाटलं नाही की हे जर मी कोणत्या नामवंत आंतरराष्ट्रीय विद्यापीठात सादर केले तर मला एखादा पुरस्कार वगैरे मिळेल. म्हणूनच अनेक शोध लावूनही त्यांच्याजवळ एकाही डॉक्टरेट नव्हती. काही विद्यापीठांनी देऊ केलेली डॉक्टरेटसुद्धा त्यांनी नाकारली होती. त्यांचे म्हणणे एकच होते “माझे संशोधन हि माझी हौस आहे आणि निसर्गानी दिलेल्या फुकटच्या ठेव्यावर हक्क सांगणारा मी कोण?” प्रकाश तसा त्यांना फार ओळखत नव्हता. खेड्यातून आलेल्या माणसाला भारी सुटातला माणूस दिसला तरच तो कोणी मोठा आहे असेच वाटते. प्रकाशही प्रोफेसर जोशींच्या बाह्यरूपाने फसला. त्याला वाटले आपले काहीतरी चुकले म्हणूनच मालकांनी आपल्याला काढले असणार. त्यात भरीस भर म्हणून काय तर प्रकाश जेव्हा प्रोफेसर जोशींच्या बंगलीवर पोहोचला तेव्हा तिचा अवतार पाहून तर त्याची खात्रीच पटली. त्याने मनोमन ठरवून टाकले की दुसरीकडे कुठेतरी नोकरी शोधायची.



प्रोफेसर जोशी यांची कार्यशाळा तशी छोटीशीच होती. पाषणच्या टेकडीजवळच त्यांची बंगली होती. खरतर पाषण परिसराला न शोभेल अशीच ती बंगली होती. आजूबाजूला सर्व सोयीनी सुसज्ज असे मोठे बंगले, त्यांचे विविध रंगी फुलांनी सजलेले आवार, आलिशान गाड्या आणि त्यामध्ये एक जुनाट लाकडी दार-खिडक्या असलेली, आजूबाजूला खुरटी झाडी आणि गवत वाढलेली प्रोफेसर जोशी यांची कौलारू दुमजली बंगली. या बंगलीमध्ये प्रोफेसर जोशी एकटेच रहात. त्यांची खोली बंगलीच्या वरच्या मजल्यावर होती. अगदी छोटीशी. एक टेबल-खुर्ची, जुनाट लोखंडी कॉट, लाकडी कपाट आणि पाण्याने भरलेला माठ. त्यांचे कपडे सदैव या खोलीच्या दाराला लटकवलेल्या अवस्थेत असायचे किंवा खोलीत बांधलेल्या एकमेव दोरीवर. कपाटाचा उपयोग हा साधारणपणे त्यांचे शोधनिबंध ठेवण्यासाठी किंवा काही प्रिय व्यक्तींनी दिलेल्या वस्तू ठेवण्यासाठीच होत होता.



प्रकाशला शेतीतच रस होता. बाचा विरोध डावलून त्यान शेतीतच पदवी मिळवायचं ठरवलं होत. त्यानंतर पुण्याच्या शेतकी महाविद्यालयातून त्याने डिग्री मिळवली होती. ती सुद्धा फर्स्ट क्लासमध्ये. पुण्यातल्या बाजीराव रोडवरील एका बी बियाणाच्या दुकानात संध्याकाळी काम करत असे. बी-बियाणाचे वजन करून त्याचे लहान मोठे पुडे करून ठेवणे, आलेला माल व विक्री यांचा मेळ घालणे, नवीन उत्पादने तसेच हंगामी उत्पादने दर्शनी भागात दिसतील अशी मांडून ठेवणे हा प्रकाशचा गिऱ्हाईक नसतानाचा फावल्या वेळातील उद्योग. मालकांना कधी काही सांगावच लागायचं नाही. प्रशांतची कामातली हुशारी आणि चिकाटी पाहून मालक खुश होते. प्रकाश पहिल्या वर्षी चांगल्या गुणांनी पास झाल्यावर त्यांनीच त्याची त्यांच्या ओळखीच्या एका कृषीतज्ञाशी ओळख करून दिली. आणि उद्यापासून माझ्या दुकानात यायचं नाही असं बजावलं. प्रकाशला प्रश्नच पडला आता काय करायचं? त्याची घालमेल पाहून ते कृषीतज्ञ त्याला हसून म्हणाले “अरे म्हणजे आजपासून तू माझ्याबरोबर माझ्या प्रयोगशाळेत काम करायचे". झाल दुसऱ्या दिवसापासून प्रकाश त्या कृषीतज्ञांच्या म्हणजे प्रोफेसर जोशी यांच्या प्रयोगशाळेत रुजू झाला.







( क्रमशः - हा एक प्रयत्न आहे एक वास्तववादी कथा सांगण्याचा. अनेकांच्या आयुष्यात असे प्रकाश येतात आणि जातात. त्यांना मार्ग कोणीच दाखवीत नसते. कारण मार्ग ज्याचा त्यानी शोधायचा असतो. )

पुढील भाग वाचण्याची इच्छा असेल तर "join this site" या बटणावर क्लिक करा किंवा आपल्या गुगल अकाऊंटने आपल्या सर्कलमध्ये समाविष्ट करा. पोस्ट अपडेट झाल्यावर आपल्याला लगेच समजेल.

आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

धन्यवाद.