Sunday, November 25, 2012

पानगळती


पानगळती सुरु झाली आहे. हळू हळू झाडाची सर्व पाने गळून जातील आणि काही संसार उघडे पडतील. काही आजूबाजूच्या गवताचे, काही काड्या काटक्यांचे, काही पानांचे, आणि काही अगदी सुबक असे वेलींचे. होय मी घरट्यामध्ये केल्या जाणाऱ्या संसारांबद्दलच बोलतोय. मला ही घरटी पाहायला फार आवडते. शहरांत हल्ली तशी फार बघायला मिळत नाही. पुरवी आम्ही फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात राहत असू तेव्हां बरीच पक्षी मंडळी पाहायला मिळायची. तिथे आजूबाजूला दाट झाडी असल्यानं या मंडळींची कायम ये जा चालू असायची. काही अगदी इवले इवले अंगठ्या एवढे पक्षी आमच्या घरामागच्या सीताफळ आणि लिंबाच्या झाडात रहात. सकाळी आणि संध्याकाळीच काय तो त्यांच्या आवाजाने परिसर किलबिलून जाई. बाकी दिवसभर ते शांतच असायचे. फक्त एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाताना त्यांच्या पंखांचा काय तो आवाज होई. या पक्षांचे घरटे म्हणजे लिंबाच्या झाडाची जाळी. याच लिंबावर एक-दोन बुलबूल बसलेले असायचे. माझ्या वडिलांनी बागेत केलेल्या लिंबाभोवतीच्या अळ्यातले पाणी पिऊन हे सर्वजण खुश झालेले दिसायचे.
घरासमोरच्या मोकळ्या जागेत चिमण्यांचे दर्शन दिवसभर असायचे. सकाळी तांदूळ निवडून झाले की तिथे थोडे टाकले म्हणजे या बाई एकदम घोळक्याने येऊन दोन मिनिटांत अंगण साफ करून जाणार. अंगणातल्या समोरच्या मेंदीवर यांचा बाकी दिवसभराचा मुक्काम. किंवा अगदीच बाजूला असलेल्या बिट्टीच्या फांदीवर चिवचिव. पावसाळ्यात मात्र या बया अंगणातल्या मातीत लोळत बसायच्या. एखाद्या लहान मुलाला मातीत खेळताना अडवाव तसे यांना अडवावे असे मला वाटे.

अंगणाच्या एका कोपऱ्यात एक नळ होता. त्यावर अगदी छान पत्र्याची शेड होती. या शेडवर कायम दोन चार काक महाराज बसलेले असायचे. नळातून ठिबकणारे पाणी प्यायला आलेल्या पक्षांवर आपल्याच जागेतल्या विहिरीवर पाणी भरायला आलेल्या लोकांना जसा विहिरीचा मालक आरडा ओरडा करून विहीर आपली असल्याची सतत जाणीव करून देतो तसे हे दरडावत असत. अधून मधून येणाऱ्या साळुंक्यांवर यांची तिरकी नजर असे. तसेच आजूबाजूने जाणाऱ्या मांजरीच्या पिलांना हे महाराज चोची मारून पळवून लावत. आमच्या घराबाजुला भरपूर गवत होते आणि त्यातल्याच एका झुडुपावर एक नागराज वास्तव्य करून होते. साधारण आठ फुट लांब असलेले हे नागराज फिरायला निघाले की काक महाराज आरडा ओरड करून त्यांच्या येण्याची वर्दी सगळ्यांना देत असत.

घराच्या जवळच एक गुंजेचे झाड होते त्यावर भारद्वाज पक्षी पाहायला मिळत. तो भाग सोडून ते सहसा इतरत्र फिरत नसत. फार फार तर आमच्या घराच्या पत्र्यावर येऊन चोची मारत. त्यांचे डोळे आणि गुंजा दोन्ही एकाच रंगाचे. लाल बुंद. हे सतत कोणावर तरी चिडून यांचे डोळे असे झाले असावेत. भारद्वाज पक्षी दिसला आणि आपण त्याच्याकडे काही मागितले व त्यानंतर तो ओरडला तर आपले मागणे पूर्ण होते असे मी ऐकले आहे. आमच्या घरामागच्या टेनिस कोर्टवर खेळायला येणारी इम्पाला मोटार आपल्यालाही मिळावी अशी इच्छा मी याच्यासमोर व्यक्त केल्यावर अनेकदा हा ओरडून गेला आहे. पण मी मोठा होईपर्यंत इम्पाला मोटारीचाच जमाना गेला त्याला हा तरी काय करणार?

घरामागच्या टेनिसकोर्टच्या कम्पाउंडवर कायम छोट्या आकाराचे पोपट थव्यांनी बसलेले असायचे. छोटे असल्याने आम्ही त्यांना चीनी पोपट म्हणायचो. रविवारी टेनिस कोर्टवर आम्ही क्रिकेट खेळायला गेलो की हे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे उडत बसत. तिथल्याच बाजूच्या पेरूच्या झाडाचे पेरू आणि जांभळाच्या झाडावरची जांभळे हे लोक फस्त करून टाकत.

मागच्या उंबराच्या झाडावर सुतारपक्षी हे झाड आपल्याच मालकीचे असून ते आपल्याला याच जन्मी तोडायचे आहे असा समाज होऊन चोच मारत तासंतास बसलेला असे. उन्हाळ्यातल्या दुपारच्या शांततेत तर त्याला अगदी चेव येई आणि त्या निरव शांततेला भंग करणारे त्याचे चोचीचे घाव त्या झाडावर बसत. अशाच त्यानी केलेल्या ढोलीत एक मोठा पोपट रहात असे. आयत्या मिळालेल्या घरच्या गच्चीत उभा राहून तो छान सुर लावत असे.

उन्हाळ्याच्या सुरुवातीला साधारण महिनाभरासाठी काही मोठे म्हणजे दोन अडीच फुटाचे गिधाडासदृश लांब चोच आणि त्यावर मधेच टेंगुळ असलेले पक्षी त्या परिसरात यायचे. चाळीस पंचेचाळीस फुट उंचीच्या गुंजेच्या वरच्या बाजूला ते वास्तव्य करीत. गुंजेवर खालच्या बाजूला असलेल्या भारद्वाज महाशयांचा यांचा काही त्रास नसावा. कारण भारद्वाज महाशयांच्या रोजनिशीमध्ये यांच्या येण्यानी काही बदल कधी जाणवला नाही.
गुंजेच्या बाजूलाच बॉटनिकल गार्डन मधल्या तळ्यावर विविधरंगी बगळे, बदकं, विणकर, खंड्या, घार, टिटवी, कोकीळ, पाण कोंबडी, असे इतर अनेक पक्षी कायम दिसायचे. एकदा पावसाळ्यात तर आमच्या घराच्या दारात एक भिजलेलं गरुडाच पिल्लू येऊन बसलं होत. आम्ही कुतूहलान त्याला धरणार होतो, पण त्यामुळे त्याला इजा होईल हे जाणून घरातल्या मोठ्यांनी आधीच सांगून टाकलं की माणसाचा हात लागला तर त्याचे आई वडील त्याला घरात घेणार नाहीत. त्यामुळे आम्ही फक्त ते पिल्लू पाहत बसलो. नंतर पाऊस थांबल्यावर ते हळू हळू जोर देत उडून झाडावर जाऊन बसले आणि नंतर निघून गेले.

आज या सिमेंटच्या जंगलात मी या सर्व पक्षी मित्रांना आणि त्यांची घरटी आठवतांना मला बहिणाबाईंच्या कवितेच्या ओळी आठवतात;

अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिन झोका झाडाले टांगला !
पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला !
सुगरीन सुगरीन अशी माझी रे चतुर तिले जाल्माचा संगती मिये गाण्य गम्प्या नर
खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा!!
तिची उलूशीच चोच तेच दात तेच ओठ तुला देले रे देवान दोन हात दहा बोटं ???

2 comments:

Bahar said...

Very Nice!

मनीचा..... आवाज said...

छान लिहिलंयस. उंबराच्या झाडावर बसणारी दोन ससाण्याची पिल्लेही आठवली आणि रात्रीच्यावेळी घरात घुसणारी वटवाघळेही आठवली. :)