Monday, December 10, 2012

माझा पहिला विमानप्रवास..


दिल्ली. आपल्या भारताची राजधानी. काही दिवसापूर्वी या दिल्लीला भेट देण्याचा योग आला. तसा मी फार काही बाहेर फिरलेलो नाही. महाराष्ट्राच्या बाहेर तर जाण्याची हि माझी, बंगलोर- हैद्राबाद नंतर तिसरी वेळ होती.


आमच्या ऑफिसतर्फे, एका सेमिनारला जाण्यासाठी आम्ही काही जण पुण्याहून विमानाने दिल्लीला निघालो. विमानप्रवासपण पहिलाच असल्याने तशी थोडी भीती वाटत होतीच. आपल्या पुण्याच्या लोहगाव विमानतळावर आम्ही साडेदहाला पोचलो. आमचं विमान अकरा वाजून वीस मिनिटांनी सुटणार होत. चौकशी केल्यावर समजले कि, ते आता बारा वाजून वीस मिनिटांनी सुटणार आहे. "झालं पहिलीच नाट् लागली..." असा विचार करायचा नाही म्हणलं तरी डोक्यात आलाच. थोडा वेळ विमानतळाबाहेरच बरोबर सोडायला आलेल्या मंडळींबरोबर गप्पा मारून, साडे अकराला आम्ही आत गेलो. तिथे ठिकठिकाणी कमांडो उभे होते. आलेल्या प्रवाश्यांच चेकिंग करण्यात ते सर्व मग्न होते. आमचं विमान ज्या कंपनीच होत त्यांच्या काउंटरवर आम्ही जाऊन आमच्या सुटकेस जमा केल्या. तिथल्या परिचारिकेने हसतमुखाने आम्हाला आमचे बोर्डिंग पास दिले आणि आम्ही पुढे गेलो. तिथे कमांडो आमचं चेकिंग करणार होते. त्याआधी आम्हाला आमच्या बरोबर असलेल्या पिशव्यांना तिथले बॅजेस लावायचे होते. एवढी सुरक्षा रक्षकांची फौज पाहूनच गांगरून जायला झालं. एक तर विमान प्रवासाची मनातली भीती त्यातून मख्ख चेहऱ्यांनी काम करणारे कमांडो. एक माणूस किती ताण सहन करणार. पण एकदाच ते चेकिंग झालं. तिथून पुढे गेल्यावर बसायला जागा होती. आम्ही तिथे स्थानापन्न झालो. थोड्या वेळानी आमचे विमान आम्हाला समोरून येताना दिसले. लोकांची रांग लावण्याची धावपळ सुरू झाली. आम्ही आमच्याच जागी बसून राहिलो. “उगाच घाई कशाला? शेवटी विमानात चढलो तरी आपली जागा ठरलेली आहे. ती काय पुण्याची PMPML आहे, धावत जाऊन जागा पकडायला?” लोक एक एक करून आपलं तिकीट आणि बोर्डिंग पास परिचारिकेला दाखवून विमानाकडे जात होते. रांग कमी झाल्यावर आम्ही जाऊन उभे राहिलो. परिचारिकेला तिकीटं दाखवली आणि विमानाकडे प्रस्थान केलं.


विमानाच्या शिडीपाशी पोहचलो तिथून वर पाहिलं आणि धड-धड अजूनच वाढली. शिडी चढून वर गेल्यावर एका छानश्या हवाई सुंदरीनी Good Afternoon Sir...” असं तिच्या मंजुळ आवाजात स्वागत केलं. एवढ्या गोड आणि लाडिक आवाजात कुणी आपलं स्वागत करण्याची अपेक्षाच नसल्याने काय बोलावं हे सुचून मी तिला फक्त एक स्माईल दिल आणि पुढे गेलो. क्षणभर एक विचार मनात येऊन गेला, “बोकड कापायच्या आधी कसं, त्याच वाजत गाजत स्वागत करतात, तस आपलं स्वागत झाल का?” पण मग विचार केला नाही नाही..हि पण याच विमानात असणार..त्यामुळे विमान पडले तरी हिच्यासाकटच पडेल. हि काय त्या उद्देशांनी नाही स्वागत करते.”

माझी जागा खिडकीपाशी होती. मी माझ्या जागेवर बसलो. खिडकीमधून बाहेर पाहिलं तर विमानाचा पंख मला व्यवस्थित दिसत होता. तो थोडासा माझ्या खिडकीपासून पुढे होता. मला वर गेल्यावर...म्हणजे विमानाने आकाशात गेल्यावर खालची दृश्ये निट दिसणार होती. विमानाचे दरवाजे सर्व प्रवासी चढल्यावर लावले गेले. शिडी बाजूला झाली होती. विमानाची घर घर सुरू झाली. फार नाही पण बऱ्यापैकी इंजिनाचा आवाज ऐकू येत होता. समोर थोड्या थोड्या अंतराने दोन हवाई सुंदऱ्या उभ्या राहिल्या होत्या. आणि त्यांनी क्रीपया ध्यान दे...अपने कुर्सी कि पेटी बां ले... या बेसूर वाटणाऱ्या कोणाच्या तरी आवाजावर खुर्चीचा पट्टा सा बांधायचा याच प्रात्यक्षीक दाखवण्यास सुरुवात केली. त्यांचा एकंदर पेहेराव, मेकअप, डोळ्यात घातलेलेल आणि बाहेर आलेल काजळ, डार्क लिपस्टिक, चप्पट बसवलेले क्लिप लावलेले केस, इत्यादी पाहून मला त्या कठपुतळी असल्यासारख्या वाटू लागल्या. विमानात फुकटचा कठपुतळ्यांचा शो दाखवायचे ठरविले तरी त्यांना अगदी सहज ते काम करता येईल असे वाटले.

हवाई सुंदरीच्या कवायतीला कंटाळून मी माझ्या खुर्चीचा पट्टा बांधून घेत बाहेर पाहू लागलो. विमान आता धावपट्टीकडे निघाले होते. आणि माझे लक्ष विमानाच्या त्याच पंखाकडे गेले जो मघा मी खिडकीतून पहिला होता. अरे देवा.. हे काय पाहतोय मी? मला एवढ्यात मरायचे नाही...वाचव हा शेवटचा वाचव.. शब्द जर मनातून ओठात आला असता तर...


विमानाचा तो पंख मी हलताना पाहत होतो. त्याची वर-खाली अशी होणारी हालचाल पाहून मला असं वाटत होत कि इंजिनीयरनी याचे स्क्रू पिळलेले दिसत नाही. विसरला कि काय? मी मनातल्या मनात देवाचा धावा करू लागलो. विमान धावपट्टीवर स्थिरावले. मला वाटले चूक लक्षात येऊन विमानाच्या ड्रायव्हरने थांबविले असेल. मी थोडे बंद केलेले डोळे उघडून बाहेर पाहायला लागलो. बाहेर त्या पंखातून अजून छोटे पंख थोडेसे गोलाकार बाहेर येत होते आणि अचानक, त्या स्थिरावलेल्या विमानाने प्रचंड आवाज करत वेगाने धावायला सुरुवात केली


विमानाचा वेग सेकांदागणीक वाढतच होता. मला मोठ्यांनी ओरडून सगळ्यांना सांगाव वाटत होतं अरे या विमानाचे पंख निट बसवलेले नाहीत...थांबवा हे विमान. पण मुळातच भिडस्त स्वभावाने उचल खाल्ली आणि मी मनातल्या मनात देवाचा धावा करत बसून राहिलो. राहून राहून सारखे वाटत होते, लहानपणी जत्रेतल्या उंच पाळण्यात बसल्यावर यायचा तसा आता पोटात गोळा येणार, नाहीतर उलटी तरी होणार. बाहेरचे जग तिरके होऊन हळू हळू सरळ होऊ लागले होते. आता वरून खालचं पुणं दिसत होत.

हवाई सुंदरींनी खुर्चीची पेटी म्हणजे पट्टा काढण्यास हरकत नाही असे सांगितले आणि मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. पंख आहे तिथेच आहे, आपली खुर्ची जागेवरच आहे, शेजारचे सर्व जागेवर आहेत, हवाईसुंदरी समोर जिवंत दिसतीये, विमान पडले नाही, उलटी झाली नाही, पोटात कसलीच वेगळी जाणीव नाही. "अरे.., मी उगाच घाबरलो होतो." विमान वर जाताना खाली दिसणाऱ्या दृश्यांना मी मुकलो होतो. तो आनंद मी निट घेऊ शकलो नव्हतो. मी खुर्चीचा पट्टा काढला. बाहेर पाहिल्यावर मला एक्सप्रेस वे दिसला. "वॉव एक्सप्रेस वे. वरून असा दिसतो?" मला माझा कॅमेरा आठवला. मी लगेच तो पाउचमधून काढला आणि बाहेरचे फोटो काढू लागलो. मघाचा तो विमानाचा पंख आता सूर्यकिरणांनी उजळला होता. मी त्याचे काही फोटो काढले आणि खाली पाहू लागलो. आम्ही हळू हळू ओढे, नद्यानाले, डोंगर, लहान मोठी घरे इमारती असे एक एक पार करत पुढे चाललो होतो. थोड्या वेळानी समुद्र दिसू लागला. अरे ड्रायव्हर चुकला कि काय? आता तुम्ही म्हणाल कि हा काय सारखा पायलटला ड्रायव्हर म्हणतोय? पण मुळातच माझा पायलट या नावाला विरोध आहे. माझ्या मते विमानात बसल्यावर ज्याचे पाय लट लट कापायला लागतात तो पायलट. विमान चालवणारा म्हणजे ड्राइव्ह करणारा तो ड्रायव्हर.

तर हा ड्रायव्हर चुकला कि काय? अशी शंका माझ्या मनात आली. बर विमानाला PMPML सारखी पाटीपण नसतेस्वारगेटसनसिटीशीपुणेदिल्ली”. नाहीतर मी त्याचा कान धरून दाखवून त्यास सांगितले असतेगाढवा निदान पाटी पाहून तरी विमान चालवीत जा.” हा विचार येताच मनातच एक नक्की केले कि, दिल्लीला गेल्यावर परिवहनमंत्री का कोण जे असतात त्यांना भेटून विमानाला पाटी लावयची विनंती करायची. माझे हे विचारचक्र चालू असतानाच विमानाने समुद्राकडे जाण्याची दिशा बदलून एक वळण घेतले, “चूक आली वाटत ड्रायव्हरच्या लक्षातमला लगेच हायसं वाटल. मी पुन्हा खाली पाहू लागलो.

हॉलीवूडच्या चित्रपटात जेव्हा विमानातून खालचे दाखवतात तेव्हा खालच्या नद्या समुद्र कसे छान निळे किंवा हिरवे दिसते, आपल्याकडे मात्र गढूळ दिसते. मला आता खाली एक धरण दिसत होते. तेही असेच गढूळ. चारपाच प्रवाह त्याला येऊन मिळाल्यासारखे भासत होते. मी मनातल्यामनात म्हणलो, "हं, हे नक्कीच गुजरात असणार." कारण, आपल्या पुण्या-मुंबईच्या नद्या गढूळ नाही तर काळ्या दिसतात. नदी नव्हे मोठी गटारेच असतात. त्यातल्या अस्वच्छ पाण्याची आठवण होते तोच हवाईसुंदरी मिनरल वॉटर घेऊन आली, "सर, मिनरल वॉटर?" मी म्हणलो, "फॉर हाऊ मच?" खरेतर बाटलीच रूप पाहून मनातल्या मनात हेच म्हणत होतो की "बाई हे खरच मिनरल वॉटर आहे का? की अजून काही? तुमचं काय जातंय. पाजाल काहीही मिनरल वॉटरच्या नावाखाली. नाहीतरी तुमच्यापैकीच एकाची कंपनी आहे नं. मग काय विमानात बसलेल्यांना लावायची सवय या असल्या मिनरल वॉटरची." पण माझी ही विचारशृंखला तोडत ती काहीसं हसून म्हणाली "इट्स फ्री सर्". मी लगेच "टू प्लीज." आता एवढे महागाचे तिकीट काढल्यावर फ्री मिळतंय तर घेऊन टाकावे. बर् अजूनही खाली धडधाकट उतरण्याची शाश्वती नव्हती. मग मरायच्या आधी पैसे तरी वसूल करावे म्हणून म्हणलो "दे दोन" बाकी काही नाही. तशीही मघाच्या भीतीने घशाला कोरड पडली होतीच.

पुढच्या दोन मिनिटांत मी दोन्ही बाटल्या रिकाम्या केल्या आणि बाजूला पहिले तर माझ्या बाजूचा इसम "कुठून आलंय हे ध्यान?" अशा मुद्रेने पाहत होता. मी एक मंदस स्माईल देत ओशाळून पुन्हा खिडकीबाहेर पाहू लागलो. तेवढ्यात, "एकस्युज मी सर्" असा आवाज कानी पडला. वळून पहिले तर एक हवाईसुंदरा. होय हवाईसुंदराच. विमानात यांना मेल फ्लाईट अटेंडंट म्हणतात. त्यानेही मेकअप केल्याचे मला दिसले. तेल किंवा जेल लावून चप्प बसवलेले केस. कोरलेल्या भुवया. त्याही काळ्या कुळ-कुळीत. गुलाबी ओठ. कडक इस्त्रीचा पांढरा शर्ट आणि काळा-निळा टाय. मी त्याच्याकडे पाहिल्यावर मला म्हणाला, "सर् एनी ड्रिंक सर्?" माझा आपला पुन्हा तोच प्रश्न, "फॉर हाऊ मच?". "सर् इट्स कॉम्प्लिमेंटरी सर्" तो म्हणाला. दोन मिनिट तो काय बोलला हेच कळले नाही. या लोकांना स्पष्ट सांगता येत नाही का "फुकट... आहे". एक तर यांचे आंग्ल उच्चार त्यातून इंग्रजी भाषा आणि आम्ही पृथ्वीवरच्या दोन समांतर वस्तू. असो तर "व्हॉट इज देअर?" माझा असा प्रश्न आल्यावर हसू दाबत तो म्हणाला "सर् टी, कॉफी एंड लेमोनेड". नुकतच एवढ पाणी प्यायल्यावर पुन्हा लगेच काही घेण शक्य नव्हत म्हणून दोन लेमोनेड दे बाबा निदान नंतर तरी पिता येईल असा विचार करून मी "टू प्लीज." असं म्हणणार तेवढ्यात मला मघाचा माझ्या शेजाऱ्याचा चेहरा आठवला आणि तोंडून फक्त "वन लेमोनेड प्लीज" एवढंच बाहेर आलं. माझ्या शेजारचा मला लेमोनेडघेताना पाहून मनातल्या मनात "आता हेही दोन मिनिटांत संपवून तू काय पुढच्या दोन मिनिटांत धरतीवर पाउस पाडायला जाणार की काय?" असे मला विचारतोय वाटले. मी ठरवून टाकलं आता याच्याकडे बघायचंच नाही. आणि लेमोनेडची बाटली बाजूला ठेवून बाहेर पाहू लागलो.

बाहेर काही डोंगररांगा दिसत होत्या. शिल्पकाराने अगदी मन लावून एक एक दगड कोरून काढावा आणि त्यात एखाद्या वादळाचा भास निर्माण करावा तसें काहीसे खाली त्या डोंगररांगांना पाहून वाटत होते. 'वाऱ्याने कोरलेलं वादळाच शिल्पं' असे नावही मी त्याला मनातल्या मनात देऊन टाकले. मी त्याचे जमतील तेवढे फोटो काढले. पण विमान पुन्हा थोडे अस्थिर झाले होते. खालचे नीट दिसत नव्हते. विमान पुन्हा थोडेसे कलले आणि आता थोडा हिरवा रंग खाली दिसू लागला. अधून मधून हिरवे उभे-आडवे पट्टे आणि त्याला पिवळ्या-तपकिरी-काळसर कडा. म्हणजे आता शेतीचा भाग चालू झाला होता. अधून मधून आता काही रस्ते, घरे, वस्त्या, गावं, नद्या असे सर्व आखीव रेखीव दिसू लागले. काही ठिकाणी एखादा मोठा रस्ता दिसे. आणि त्याच्याबाजूला अगदी चिकटून चिकटून छोटी छोटी घरे आणि त्यांना जोडणारे रस्ते. शाळेत भूगोलाच्या पुस्तकात वाचलेलं आठवलं, "जगतील सर्वात जास्त वस्ती ही नद्यांच्या किनाऱ्यावर झाली आहे. उदाहरणार्थ नाईल नदी. कारण नद्यांचे क्षेत्र हे सुपीक जमिनीचे असते आणि त्यामुळे धन-धान्य पिकवण्यास ही जागा अनुकूल असते." मला ते वाक्य बदलून "जगातील सर्वात जास्त वस्ती ही महामार्गाच्या किनाऱ्यावर झाली आहे. उदाहरणार्थ, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे. कारण रस्त्यांचे क्षेत्र हे सधन गिऱ्हाईकांचे ठिकाण असते आणि त्यामुळे व्यापार करण्यास ही जागा अनुकूल असते."असे करावे वाटले. बघा आठवून जर कोणाला आठवत असेल तर. पूर्वी जुन्या हायवेनी पुण्याहून मुंबईला जायला पाच तास लागायचे. रस्त्यात दोन रुपयाची करवंद अथवा जांभळ, लोणावळा-कर्जत जवळ चार रुपयाचा वडा-पाव आणि दोन-तीन रुपयाचा चहा. एसटीचे तिकीट साठ-सत्तर रुपये. एकूण माणशी सत्तर-ऐशी रुपये खर्च. आता एक्सप्रेस वे झाल्याने पुणे-मुंबई अंतर कमी झाले. पण दोन रुपयाची करवंदे वीस रुपये, वडा-पाव वीस रुपये आणि चहाही वीस रुपये. सबकुछ एक भाव में! आणि एसटीच्या लाल डब्याची जागा 'शिवनेरी' ने घेतली आहे. तिकीट फक्त तीनशे वीस. एकूण खर्च चारशेच्या आसपास. प्रवासाला एकूण लागणारा वेळ चार-साडेचार तास. आता या सुविधा आल्या तर त्या पुरविणारे पण आले. आणि झाडांनी नटलेलं लोणावळा आता बंगले आणि हॉटेलनी नटले आहे. एकुणात काय, रस्ते-महामार्ग हे वस्ती करण्याचे ठिकाण झाले आहे.

एव्हाना खाली बऱ्यापैकी आखीव रेखीव रस्ते दिसू लागले होते. शेतीचे पट्टेही अगदी त्याच रस्त्यांच्या बाजूला कोरलेले दिसत होते. मधूनच काही हिरवे-निळे-पांढरे पट्टे दिसत होते. म्हणजे हा इंडस्ट्रीयल भाग असावा असा अंदाज मी बांधला. मधेच काही धूर सोडणाऱ्या मोठ-मोठ्या चिमण्या त्याची साक्ष देत होत्या. हवाईसुंदरी आणि हवाई सुंदरा दोघेही एक काळी पिशवी घेऊन पुढे-पुढे येताना दिसले. लोक त्यांत रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, चहाचे कप इत्यादी टाकत होते. मी म्हणलो "ये हुई बात" आपल्या शिवनेरी मधेही असं काहीसं करून टाकावं. गाडी कशी एकदम स्वच्छ. माझ्या शेजाऱ्याची चुळबुळ सुरु झाली. मुबईत लोकलमधून प्रवास करणारे चाकरमाने जसे त्याचं स्टेशन आलं की आवरा आवर सुरु करतात तसें त्याने वरच्या कपाटामधून त्याची बॅग काढली आणि बरोबर आणलेलं मासिक त्यांत ठेवलं. त्यातलाच एक कंगवा काढून त्याने केस नीट केले. शर्ट व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. आणि बॅगवर हात ठेवून बसला. मला त्याच फार हसू आलं. जस काही तो त्याच हवं ते ठिकाण आल्यावर विमानातून खाली उतरणार आहे. सगळ्यात आधी.

हवाईसुंदरी पुन्हा एकदा समोर येऊन उभी राहिली. पुन्हा तोच कर्णकटू आवाज येऊ लागला. क्रीपया ध्यान दे...अपने कुर्सी कि पेटी बां ले... या बेसूर वाटणाऱ्या कोणाच्या तरी आवाजावर खुर्चीचा पट्टा सा बांधायचा याच प्रात्यक्षीक त्यांनी पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. मी माझ्या खुर्चीचा पट्टा लावला आणि बाहेर पाहिलं.

अहाहा! सुंदर अप्रतिम. दृश्य इतकं विलोभनीय होत की मला फोटो काढायचेही लक्षात राहिले नाही. मी फोटो काढेपर्यंत ते दृश्य मागे गेल होत. ते होत दिल्लीच प्रसिद्ध 'लोटस टेंपल'. वरून दिसणाऱ्या त्या कमळाच्या पाकळ्या सूर्याच्या किरणांनी न्हाऊन निघाल्या होत्या. आज पहिल्यांदाच मला सूर्याचा हेवा वाटला. त्याला रोज अशी अनेक विलोभनीय दृश्ये वरून पाहता येत असणार. आता एकमेकांमध्ये गुंतलेले पूल, रस्ते उंच इमारती, यमुना नदी, मोठ-मोठ्या प्रशासकीय इमारती असे बरेच काही दिसू लागले होते. एकंदरीतच दिल्लीचं-राजधानीच  वैभव  आम्ही पाहत होतो. विमान आता तिरक झाल होत. खाली भव्य अस विमानतळ दिसत होत. पुण्याच्या विमानतळाच्यापेक्षा कितीतरी मोठ. लहान-मोठी विमानं एका ओळीत उभी होती. अगदी शिस्तीत. सामान घेऊन जाणाऱ्या गाड्या, प्रवासी  घेऊन जाणाऱ्या बस, काही कर्मचारी त्यांच्या रंगी-बेरंगी कपड्यात दिसत होते. हळू-हळू आमच्या  विमानाने खाली जाण्यास सुरुवात केली. मी मनात म्हणलो "कोसळलो..." पण एक हलकासा धक्का बसला आणि विमान धावपट्टीवरून धावायला लागलं. त्याचा वेग हळू-हळू कमी झाला आणि ते थांबलं. होय थांबलं!

मला आपण सुखरूप दिल्लीत पोचलो आहोत हे खरचं वाटत नव्हत. माझ्या शेजारचा माणूस उठून उभा राहिला. माझ्याकडे पाहिलं. हसला. आणि म्हणाला "इट वॉज नाईस जर्नी विद् यू". इतका वेळ मी ज्याच्या शेजारी बसून तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल याचा विचार करणारा मी त्यावेळेस काय बोलाव हे सुचून फक्त हसलो. आम्ही विमानातून उतरून खाली आलो. वरचं मोकळ आकाश पाहिलं आणि आपण दिल्लीला विमानाने सुरक्षित पोहोचलो याची जाणीव मला झाली. एक वेगळीच अनुभूती झाली. मंद वाऱ्याची झुळूक जशी मनाला स्पर्शून जाते तशी. दिल्लीच्या वैभवसंपन्न विमानतळाचे दर्शन घेताना मनात कुठेतरी डेक्कनचा बस स्टॉप होता, शिवाजीनगर एसटी स्टँड होता, PMPML चं लाल-पिवळ तिकीट होत, वाहकाची टिंग-टिंग वाजणारी बेल होती आणि चालकाची बाहेर टाकलेली तंबाखूची पिचकारी होती.

मित्रांनो...खरंच सांगतो विमान प्रवास जरूर करावा. ते ऐश्वर्य जरूर पहावं. अनुभवावं. पण..आपली बस किंवा एसटी कधी विसरू नये. कारण आपल्या खऱ्या मार्गाला तीच आपल्याला घेऊन जाणार असते. जमिनीवरून. घट्ट रुतलेल्या चाकांनी. हवेतली मजा थोडी आणि सोंग फार.


धन्यवाद.