Sunday, April 14, 2019

ओळख
“सचिन, अरे उद्याची तयारी कुठपर्यंत आली?”
“हो भाऊ झालीच”
“हं. बरं तू आणि बाकीची पोरं जेवलात न
पोटभर?”
“हो भाऊ जेवलो आम्ही”
“बरं मग. उद्या सकाळी लवकर कामाला लागा.
जे लोक बाहेर गावाहून येणार आहेत त्यांच्या चहा नाष्ट्याची सोय, जेवणाची सोय नीट करा. लोक चार वाजल्यापासून यायला लागतील, त्यांना पाणी वगैरे द्या. आपले लोक वेगवेगळ्या ठिकाणी मदतीला असुदेत. आणि काही लागल तर मला डायरेक्ट फोन कर. मी सहा वाजेपर्यंत येईन तोपर्यंत मैदान पूर्ण भरण्याची जबाबदारी तुझी. या सभेचा तू प्रमुख आहेस. चल ठेवतो आता. गुड नाईट!”

“गुड नाईट भाऊ!”


त्याने घड्याळात पाहिलं रात्रीचे अडीच वाजले होते. एवढ्या रात्री भाउंनी स्वतः आपल्याला फोन केला या जाणिवेनेच त्याची छाती अभिमानाने फुलली.
आपल्याला एक “नवी ओळख” मिळाली आहे असं त्याला वाटलं.

“चला रे आता झोपूया”, असं म्हणून तो स्वतःही स्टेजवरच्या एका कोपऱ्यात पहुडला.

सकाळी सहा वाजताच तो उठला. बाकीच्यांनाही उठवलं. जवळच्याच एका टपरीवर जाऊन सगळ्यांनी चहा घेतला. स्टेजच काम तसं होतच आल होतं. फुलांच्या माळांनी आता स्टेज सजवायचे होतं, बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांच्या चहा-नाष्ट्याची सोय बघायची होती, स्टेजवरच्या मान्यवरांचे यथासांग स्वागत करण्यासाठी वेगवेगळ्या माणसांना नेमायचे होते, त्यानंतर दुपारच्या जेवणाची सोय बघायची होती…

तो सगळं मन लावून करत होता. भाऊंनी या सभेची पूर्ण जबाबदारी आपल्यावर दिली आहे. आपणच या सभेचे प्रमुख नियोजक आहोत, असं भाऊ म्हणाले आहेत. म्हणूनच तर रात्री एवढ्या उशिरा भाऊंनी स्वतः आपल्याला फोन केला. आपल्यावर एवढी मोठी जबाबदारी भाऊंनी दिली आहे तर आपण ती व्यवस्थित पार पाडली पाहिजे आणि भाऊंचा विश्वास सार्थ ठरवला पाहिजे.

सतत वाजणारा फोन, येणाऱ्या लोकांचं स्वागत, त्यांची उठबस करता करता दिवस कसा संपला आणि संध्याकाळ कधी झाली हे त्याला कळलच नाही. आजची निवडणुकीची ही शेवटची सभा होती. परवा मतदान होते आणि त्यामुळेच या सभेला विशेष महत्त्व होते. स्टेज छान सजले होते. हवी तशी गर्दी जमली होती. मैदान पूर्ण भरले होते. आलेले मान्यवर वक्ते त्यांची त्यांची भाषणे करत होते. सगळ्यांना आतुरता होती ती भाऊंची.

साडेसहा झाले आणि भाऊ आले. भाऊंसाठी त्याने खास ढोल पथक बोलावले होते. भाऊ आल्या आल्या पथकाने वाजवायला सुरुवात केली. गर्दीतून त्याच्याच माणसांनी आधी आणि मग गर्दीने भाऊंच्या नावाचा जयघोष केला. भाऊ जिंकणार याची खात्रीच जमलेली गर्दी देत होती. भाऊंनी गर्दी पाहून सचिनच्या पाठीवर थाप मारली “भले शाब्बास! छान गर्दी जमली आहे” अस ते सचिनला म्हणाले. सचिनला ते पूर्ण मैदानच आपल्या  मुठीत आल्यासारखे वाटले. थोड्यावेळाने भाऊ भाषणाला उभे राहिले. साधारण तास-दीड तास त्यांचे भाषण चालू होतं. भाषण झालं तसं सर्व मान्यवरांनी भाऊंच अभिनंदन केलं. भाऊ त्यांच्या गाडीकडे निघाले. सचिन त्यांना भेटायला गेला आणि भाऊंच्या अंगरक्षकांनी त्याला बाजूला केलं. भाऊ हसले. गाडीत बसले. सगळ्यांना हात केला आणि निघून गेले.

थोड्याच वेळात संपूर्ण मैदान रिकामे झाले. आता सचिन आणि त्याच्याबरोबरचे कार्यकर्ते, मांडव वाले एवढेच काय ते तिथे राहिले. सभा तर यशस्वी झाली होती म्हणून भाऊंशी बोलावं आणि त्यांना शुभेच्छा द्याव्या यासाठी त्यांन भाऊंना फोन केला. रिंग वाजत राहिली पण कोणीही फोन उचलला नाही. भाऊ कामात असतील म्हणून त्याने फोन ठेवून दिला. सगळी आवराआवर झाली आणि त्याचबरोबर ते सर्व भुकेने कासावीस झाले. रोज “जेवलात का?” म्हणून फोन करणाऱ्या भाऊंचा आज फोन आला नाही. ज्या हॉटेलात सोय केली होती तिथे गेल्यावर कळाले जेवणाची सोय कालपर्यंत होती. शेवटी तो आणि बाकीचे कार्यकर्ते एका वडापावच्या गाडीवर गेले आणि तिथे वडापाव खात होते.

पुन्हा एकदा भाऊंना फोन लावून बघावं म्हणून त्याने फोन लावला.
फोन उचलला गेला. भाऊंचा असिस्टंट बोलत होता,
“काय रे एवढ्या रात्री कशाला फोन केलास?” 
“अंं... ते.., भाऊंशी बोलायचं होतं.”
“ही काय वेळ आहे का भाऊंशी बोलायची? भाऊ झोपलेत. उद्या फोन कर. चल ठेव आता.”
फोन कट झाला होता.

त्याला लक्षात आलं होतं आपलं काम झालंय. भाऊ पुन्हा पाच वर्षांसाठी झोपलेत. आपण पुन्हा एकदा कार्यकर्ते आहोत. कोणीही आपल्याला आता ओळखत नाही. आपली “ओळख” प्रचाराच्या शेवटच्या क्षणीच संपली आहे.

सकाळपासून आईचा चार-पाच वेळा फोन आला होता. कामाच्या गडबडीत त्याने तो कट केला होता. त्याने आईला फोन लावला. फोन लागला आणि पलीकडून आवाज आला, “सचिन, अरे बाळा जेवलास का रे?”(यातील प्रसंग व सर्व पात्रे काल्पनिक असून, त्यांचा कोणत्याही अस्सल भाऊ, ताई, दादा, साहेब इत्यादी लोकांशी संबंध नाही. कृपया ओढूनताणून जोडूही नये. असे प्रसंग फक्त राजकारणातच येतात असे नाही तर कुठेही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात येत असतात.)

Saturday, April 13, 2019

सामान्य

५ वाजले होते. सुरेशची गाडी सिग्नलला आली. लाल सिग्नल होता. त्याने गाडी थांबवली. सकाळी ७ ला घर सोडलं होते त्याने. चहा आणि ४ ग्लुकोजची बिस्किटं खाऊन. त्याच्या घरापासून त्याच ऑफिस गाठायला त्याला एक-दीड तास लागायचा. ट्रॅफिकमधून वात काढत ऑफिसला पोहोचलं कि तिथून पुढे आज कुठे जायचंय हे कळायचं. मार्केटींगचा जॉब होता त्याचा. शहरातील जो भाग पिंजून काढायचाय त्याच नाव आणि तिथले वेगवेगळे पत्ते मिळाले कि पुन्हा गाडीला किक मारायची आणि निघायचं. सगळ्या पत्त्यांवर जाऊन काम झालं कि ऑफिसला एक फोन करून सांगायचं आणि डायरेक्ट घरी.

आज नेमकं लांबचा भाग मिळाला होता. शहराच्या दुसऱ्या टोकाचा. सुरेश त्याच्या कामात एकदम तरबेज होता. त्याचं आजचं काम लवकर आटोपलं होते. १० पत्त्यांपैकी २ पत्त्यांवर कुलूप होते. पण तरीही तो आज खूप थकला होता. सूर्य आज सकाळपासून आग ओकत होता. कितीही पाणी प्यायलं तरीही तहान भागल्यासारख वाटत नव्हत. रस्त्यावरची वाहनांची वर्दळ, त्यांचे होर्नचे आवाज, पोटातली भूक या सगळ्याने तो जास्तच वैतागला होता. घामाने शर्ट पूर्ण ओला झाला होता. महिना अखेरीमुळे खिशात पैसेपण नव्हते. अचानक एका आवाजाने त्याच विचारचक्र तुटलं. "बंधुंनो आणि भगिनींनो, आज संध्याकाळी ठीक ७ वाजता आपले आमदार साहेब श्री..... यांची सभा याच ठिकाणी होणार आहे....". सकाळपासून उन्हात फिरून वैतागलेल्या त्याच्या मनाचा ताबा आता रागाने घेतला. "सभा घेणार म्हणे, निवडणूक आली कि हे भेटायला येणार. चांगली नोकरी देऊ, घर देऊ, सगळ्या वस्तू स्वस्त करू म्हणणार आणि नंतर हे सगळे गायब होणार." त्याची कानशील गरम झाली, त्याला वाटलं आत्ताच सभेच्या ठिकाणी जावं आणि ....

एकदम गडगडाट झाला आणि त्याच्या अंगावर थेंब पडू लागले. पावसाचे. होय पावसाचे. उन्हाळ्यात एकदम कसा हा पाऊस? तो विचारच करत होता पण मागून हॉर्न वाजू लागले. सिग्नल हिरवा झाला होता. पण त्याला निघावे वाटत नव्हते. त्याने गाडी बाजूला घेतली. पावसाचे थेंब अंगावर झेलत तो तिथेच बाजूला उभा राहिला. पावसाचा प्रत्येक थेंब जसा सामान्य असतो जिथे पडेल तिथला होतो. त्याच स्वतः च असं काहीच विशेष नसतं. पण तरीही जर उष्ण मातीवर पडला तर एक मंद दरवळ पसरतो. तसच त्याच्याही उष्ण विचारांवर ते थेंब पडले आणि मघा जे विचार डोक्यात होते ते विरून तोहि त्या पावसाशी एकरूप झाला होता. पावसाच्या थेंबासारखा. सामान्य.

Thursday, July 5, 2018

तू असाच कोसळत रहा...

तू असाच कोसळत रहा
कोसळता कोसळता पुसून टाक
मळभ झाड वेलींच्या पानांवरचे आणि आमच्या मनांवरचे

तू असाच कोसळत रहा
कोसळता कोसळता भरून टाक
डोह छोट्या मोठ्या बांधांवरचे आणि आमच्या ऊर्जेचे

तू असाच कोसळत रहा....
तू असाच कोसळत रहा....

Wednesday, May 31, 2017

विशाल वृक्ष, मी आणि अथांग सागर
विशाल वृक्ष, मी आणि अथांग सागर

द्वंद्व मनाचे की भविष्याचा जागर


एक खळाळता फेसाळता सागर


की अनेक सळसळते चंचलते निर्झर


विस्तिर्ण झेपावती वेडीवाकडी फांदी


की सक्षम आधाराची विस्तारित नांदी 


विशाल वृक्ष, मी आणि अथांग सागर


द्वंद्व मनाचे की भविष्याचा जागर!
-मोहिनीराज भावे

Thursday, March 9, 2017

महिला दिन


काल "जागतिक महिला दिन" होता, मी विचार केला, "चला आज आईला थोडा संध्याकाळच्या कामातून सुट्टी देऊ." तिला विचारले, काय करूया? जाऊया का कुठे बाहेर? तिनी पण बहुतेक विचार केला, चला आज कधी नव्हे ते मुलगा लवकर घरी आलाय तर फिरून येऊ. ती म्हणाली, "चल आज भेळ खाऊ." मी पण लगेच तयार झालो.

आम्ही छान तयार झालो, चारचाकीत बसलो आणि निघालो. संध्याकाळची वेळ असल्यानं रस्ता जरा धीम्या गतीन पुढे सरकत होता. काय म्हणालात? रस्ता कसा सरकेल? या पुण्यात तेही वारज्यात मग कळेल. असो तर आमचा रस्ता हळू हळू पुढे सरकत होता आणि आम्ही आजूबाजूला पाहत होतो. काही बसेस खास महिला दिनानिमित्त सजवल्या होत्या. अगदी हार, तोरणे बांधली होती. या फक्त महिला स्पेशल बस होत्या. मी अगदी कुतूहलान ३-४ वेळा या बसेस कडे पाहिले, मी शोधात होतो महिला वाहक आणि चालक. ते काही दिसले नाहीत. काही ठिकाणी आहेत असे ऐकले होते. असो. तर आम्ही तिथून सरकत पुढे गेलो. सिंहगड रोडवर.

एका महिलांनी चालवलेल्या खाद्यपदार्थ केंद्रामधून छान वडा-पाव घेतले. एकदम छान गरम-गरम. खमंग. अजून घ्यावे वाटत होते पण भेळ खायला निघालो होतो नं. आमच्या नेहमीच्या भेळपुरीच्या दुकानात गेलो. दुकान तसे प्रसिद्ध असल्याने दुकानात बरीच गर्दी होती. काही लोक बाहेर ठेवलेल्या खुर्चीवर बसले होते, काही उभ्यानच खात होते आणि काही रांगेत उभे होते. मी २ रिकाम्या दिसणाऱ्या खुर्च्याकडे वळलो. आईला बसायला सांगून भेळ घेण्यासाठी रांगेत उभा राहिलो. थोड्या वेळान माझा नंबर आला. भेळ तयार करणाऱ्या मुलाला मी सांगितलं, "दादा, एक मस्त झणझणीत भेळ कर आणि एक मिडीयम बनव." तो पण कामाला लागला. चिंचेच्या पाण्याचा, हिरव्या मिरचीच्या ठेच्याचा मस्त वास येत होता. "आहा, आज मस्त ताव मारायचा भेळेवर" मी मनोमन पक्के केले. खूप दिवसांनी असा योग आला होता. थोड्याच वेळात मस्त शेव, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि बारीक चिरलेली कैरी अश्या जिन्नसांची रेलचेल असलेलं गार्निशिंग केलेली, बघताच जिभेला पाणी सुटेल अशी भेळ दोन डिशमध्ये समोर आली. मी दोन्ही डिश घेऊन बाहेर आई जिथे बसली होती तिथे पोचलो. एक डिश तिच्या हाती देऊन बाजूच्या खुर्चीवर आसनस्थ झालो.

भेळ खरचं छान जमली होती. भेळ खाताखाता आम्ही आजूबाजूला रस्त्यावर काय चालू आहे ते बघत होतो. वर्दळ जशीच्या तशी होती. महिला-पुरुष सर्व कसल्यातरी घाई-गडबडीत चालले होते. प्रत्येकाला पुढे जायची घाई आणि त्यातून त्यांचा आणि इतरांचा उडलेला गोंधळ. काही शिस्तबद्ध तर काही बेशिस्त वाहनचालक. आमच्या समोर दुकानाच्या पायऱ्यांच्या बाजूला एक महिला तिच्या दोन मुलांसह बसली होती. पतीराज बहुदा भेळ घ्यायला दुकानात गेले असावेत. ती मस्त मुलांबरोबर गप्पा मारत होती. तेवढ्यात तिचे पतीराज हातात २-३ प्लेट्स घेऊन आले. एक तिच्या हातात दिली आणि बाकी मुलांच्या हातात. परत आत गेले. ती महिला आणि मुल प्लेटमधील पदार्थ खाऊ लागले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. छान एन्जॉय करत होते ते. पतीराज परत आले. बसायला खुर्ची शोधायला लागले. एकही खुर्ची बसायला शिल्लक नव्हती. त्यांनी जरा इकडे-तिकडे बघितलं आणि बायकोला म्हणाले, "तू एक काम कर इकडे पायरीवर बस. मी खुर्चीवर बसतो." बायको हातातली प्लेट सांभाळत खुर्चीतून उठली आणि पायरीवर बसली. पतीराज खुर्चीत स्थानापन्न झाले. पायरीवरून अनेक लोक जात-येत होते, महिला थोडी अवघडून बसली होती. पतीराज मात्र हातातली प्लेट संपवण्यात मग्न झाले होते. त्यांची निम्मी प्लेट रिकामी झाली असेल तोच त्यांचा मोबाईल ओरडला. पतीराजांनी पुन्हा इकडे-तिकडे पहिले. आणि आपली प्लेट बायकोच्या हाती देत त्यांनी मोबाईल कानाला लावला. "हा..बोल.... नाही जरा बाहेर आल्तो. काय? अरे नाय आज महिला दिन हाये ना म्हनून बायकोला आनी मुलांना बाहेर घेऊन आल्तो." मी पायरीवर अवघडून बसलेल्या त्याच्या बायकोकडे आणि आरामात बसलेल्या त्याच्याकडे पाहिलं आणि माझी मान (मन) दुसरीकडे वळवली.

रस्त्यावर आता काही अंतरावर फुगे विकणाऱ्या महिला-मुली उभ्या होत्या. रंगीबेरंगी फुगे मनाला शांत करत होते. आनंद देत होते. मन वयानी लहान होत होते. माझ्या मागे बसलेल्या कुटुंबातील मुलांनी फुग्यांचा हट्ट सुरु केला. त्याच्या आईने एका फुगेवालीला बोलावले. साधारण १४-१५ वर्षांची ती मुलगी पुढे आली. कळकट्ट, धुळीने माखलेले कपडे, विस्कटलेले अस्ताव्यस्त केस, भुकेने अशक्तपणाने पांढरे झालेले डोळे आणि दिन हास्य. असा त्या मुलीचा अवतार होता. ती मुलगी फुगे दाखवू लागली. एक पाच रुपयाचा, एक दहा रुपयाचा तर एक वीस रुपयाचा. लाल, निळे, हिरवे असे तीन रंगातले फुगे तिच्याकडे होते. मुलांची आई तिच्याशी भाव करू लागली. विसचा फुगा दहा ला दे म्हणू लागली. त्यांचा हा संवाद चालू होता तेवढ्यात दुकानाच्या काउंटरवरील माणूस एकदम पुढे आला. "ए चल पुढे हो. इथे नको थांबू. चल जा पुढे. निघ. आणि परत नको येऊ. कटकट साली. रोजची कटकट झालीये." असे म्हणून फुगेवालीला हकलू लागला. ती मुलगी त्याला सांगू लागली, "दादा, या ताईंनी बोलावलं म्हणून आले." फुगे विकत घेणारी बाई गप्प. तो माणूस पुन्हा ओरडला, "ए, माहितीये चल हो पुढ. यांना सगळे फुकट हवे, येतात भिका मागायला" मुलगी घाबरली. थोडी मागे सरकली. तशी विकत घेणारी बाई म्हणली, "ए दे दहावाले दोन." दुकानातला माणूस पुन्हा काउंटरवर गेला. फुगेवालीन दोन फुगे दिले आणि वीस रुपये घेऊन ती आणि तिच्या बरोबरच्या इतर फुगेवाल्या पुढे गेल्या.

माझी भेळ संपली होती. मी समोरच्या पायरीवर बसलेल्या महिलेकडे, फुगे विकत घेणाऱ्या बाईकडे, दुकानाबाहेर फुटपथावर अनधिकृतपणे मांडलेल्या खुर्चीकडे आणि पाठमोऱ्या कष्टाळू फुगेवालीकडे बघत होतो.  मला कळतच नव्हते कोणाचे हात कष्ट करणारे आणि कोणाचे फुकटे. तेवढ्यात बाजूच्या खुर्चीवरची मुलगी कोणाशी तरी मोबाईलवर बोलताना म्हणाली, "अग, आज वूमन्स डे आहे नं म्हणून तो म्हणला चल पाणीपुरी खाऊ..."

मी आईला म्हणलो, "आजही महिला दीन आहे".

मी आणि आई उठून गाडीकडे चालायला लागलो....