मी साधारण पहिल्या इयत्तेत असताना आम्ही कर्वेनगर मधून फर्ग्युसन महाविद्यालयातील सेवक वसाहतीत राहायला गेलो. कर्वेनगर मध्ये आम्ही ज्या चाळीत राहत होतो ती गल्ली नंबर आठ मधील माझिरे चाळ या फर्ग्युसन महाविद्यालयातील चाळीपेक्षा मोठी म्हणजे दुमजली होती आणि आजूबाजूलाही काही चाळी होत्या. फर्ग्युसनमध्ये मात्र आमच्या चाळीच्या मागे एक टेनीस कोर्ट होते आणि समोर काही बंगले होते. पण मला सर्वात जास्त आवडला तो फर्ग्युसन रस्ता. कर्वेनगर मधील आमच्या चाळी पर्यंत असलेला रस्ता हा कच्चा आणि कायम डबक्यानि भरलेला असे. तर हा फर्ग्युसन रस्ता मात्र कसा छान डांबरी दोन्ही बाजूंनी गर्द झाडी असलेला होता.
गरवारे पुलापासून सुरु होणारा हा रस्ता अगदी शेतकी महाविद्यालयापर्यंत पसरलेला आहे. आणि दोन्हीबाजुला असलेली झाडी त्याला विशेष रंगत आणायची. वड, पिंपळ, गुलमोहर,कडूनिंब, इत्यादी वृक्षांची इथे सावली होती. कधीही दुपारच्या उन्हात या रस्त्यावरून जाणारा माणूस थकत नसे कारण कितीही प्रखर उन असले तरी फर्ग्युसन रस्त्यावर मात्र शांत आणि शीतल सावली देणारी झाडे होती. यातील बऱ्याच वृक्षांनी सावली दिली होती ती मोठ मोठ्यांना. यात टिळक होते, आगरकर होते, नामजोशी होते, गोखले होते, चिपळूणकर होते...
अशा थोरा-मोठ्यांना ज्या वृक्षांनी सावली दिली त्या वृक्षांच्या सावलीतून चालणे हेही एक भाग्यच होते. या वृक्षांबरोबरच या रस्त्यावर दोन सुंदर मंदिरे आहेत एक संत तुकाराम महाराजांच आणि दुसर संत ज्ञानेश्वर महाराजांच. या मंदिरांमुळे या रस्त्याने अनेक पालखी सोहळे पहिले आहेत आणि मीही. ज्ञानबा-तुकाराम असं जयघोष करत जाणारे एवढा प्रचंड जनसमुदाय, त्यांच्याबरोबर असलेले घोडे, बैल, टाळ-मृदुंगाचा नाद ऐकून मंत्रमुग्ध व्हायला होत असे. आणि अभिमानही वाटत असे कि माझ्या घराच्या बाजूच्या रस्त्यावरून पालखी जाते. नुसती जातच नाही तर या मंदिरांसमोर विसावते. इथे या विसावलेल्या पालखीच्या दर्शनाला अनेक भाविक जमत आणि ते पालखीतील वारकरी समुदायाला फराळ देत. जशी गावाकडच्या लोकांना त्यांच्या गावातील जत्रेत मजा येते तशीच मजा मला या तास दोन तासाच्या जत्रेत येत असे. बीज काळातील सप्ताहात तुकाराम महाराज मंदिरात कीर्तनाची रेल चेल असे तीला लाउड स्पीकरची जोड नव्हती तरी आमच्या घरात कीर्तन ऐकू येई. आपोआप संस्कार मनावर घट्ट विणले जात त्यासाठी आम्हाला संस्कार वर्गात जावे लागत नव्हते.
रंगपंचमीला महाविद्यालयातील तरुण तरुणींची इथे झुंबड उडत असे. पूर्ण रस्त्यावर हि मंडळी रंग उधळत आनंदाने फिरत असत मग वेळ कोणतीही असो सकाळ, दुपार कि संध्याकाळ. ख्रिसमस, न्यू ईयर, या दिवशी सुद्धा हा रस्ता गजबजून जात असे. आताही गजबजलेला असतो पण पोलीस बंदोबस्तात.
त्याकाळी समृद्ध असलेल्या या रस्ता वर काही तुरळक दुकाने व हॉटेल्स सोडली तर बाकी काही नव्हते पण तरी तो नयनरम्य होता. आज त्याच रस्त्यावरून जायची इच्छा होत नाही, त्याची दुरवस्था पाहवत नाही. दोन्हीबाजूनि उभे असलेले मॉल्स, आणि महापालिकेने केलेले खड्डे, यातच कधीकाळी काळी वृक्षांच्या सावलीत रमलेला हा रस्ता आता हरवला आहे...
1 comment:
खरंय... त्या रस्त्याची एक बाजू तरुणाईने नटलेली आणि दुसरी बाजू संतांच्या अभंगात रमलेली होती. एकीकडे करमणुकीसाठी राहुलला जाण्याचा मोह तर एकीकडे उच्च शिक्षणासाठी विद्यापीठात जायची आस. कुणाला बी.ए., बी.कॉम्. किंवा बी.एस्.सी.चे शिक्षण घेऊन परदेशी जाण्याची स्वप्नं तर कुणाला शेती विषयक शिक्षण घेऊन गावच्या मातीची ओढ...
या सगळ्यांना आपापल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी टिळक आगरकर यांचे आशीर्वाद आणि वटवृक्षाची शीतल छाया................ हे सारं कुठेतरी हरवलंय.
Post a Comment