Thursday, March 9, 2017

महिला दिन


काल "जागतिक महिला दिन" होता, मी विचार केला, "चला आज आईला थोडा संध्याकाळच्या कामातून सुट्टी देऊ." तिला विचारले, काय करूया? जाऊया का कुठे बाहेर? तिनी पण बहुतेक विचार केला, चला आज कधी नव्हे ते मुलगा लवकर घरी आलाय तर फिरून येऊ. ती म्हणाली, "चल आज भेळ खाऊ." मी पण लगेच तयार झालो.

आम्ही छान तयार झालो, चारचाकीत बसलो आणि निघालो. संध्याकाळची वेळ असल्यानं रस्ता जरा धीम्या गतीन पुढे सरकत होता. काय म्हणालात? रस्ता कसा सरकेल? या पुण्यात तेही वारज्यात मग कळेल. असो तर आमचा रस्ता हळू हळू पुढे सरकत होता आणि आम्ही आजूबाजूला पाहत होतो. काही बसेस खास महिला दिनानिमित्त सजवल्या होत्या. अगदी हार, तोरणे बांधली होती. या फक्त महिला स्पेशल बस होत्या. मी अगदी कुतूहलान ३-४ वेळा या बसेस कडे पाहिले, मी शोधात होतो महिला वाहक आणि चालक. ते काही दिसले नाहीत. काही ठिकाणी आहेत असे ऐकले होते. असो. तर आम्ही तिथून सरकत पुढे गेलो. सिंहगड रोडवर.

एका महिलांनी चालवलेल्या खाद्यपदार्थ केंद्रामधून छान वडा-पाव घेतले. एकदम छान गरम-गरम. खमंग. अजून घ्यावे वाटत होते पण भेळ खायला निघालो होतो नं. आमच्या नेहमीच्या भेळपुरीच्या दुकानात गेलो. दुकान तसे प्रसिद्ध असल्याने दुकानात बरीच गर्दी होती. काही लोक बाहेर ठेवलेल्या खुर्चीवर बसले होते, काही उभ्यानच खात होते आणि काही रांगेत उभे होते. मी २ रिकाम्या दिसणाऱ्या खुर्च्याकडे वळलो. आईला बसायला सांगून भेळ घेण्यासाठी रांगेत उभा राहिलो. थोड्या वेळान माझा नंबर आला. भेळ तयार करणाऱ्या मुलाला मी सांगितलं, "दादा, एक मस्त झणझणीत भेळ कर आणि एक मिडीयम बनव." तो पण कामाला लागला. चिंचेच्या पाण्याचा, हिरव्या मिरचीच्या ठेच्याचा मस्त वास येत होता. "आहा, आज मस्त ताव मारायचा भेळेवर" मी मनोमन पक्के केले. खूप दिवसांनी असा योग आला होता. थोड्याच वेळात मस्त शेव, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि बारीक चिरलेली कैरी अश्या जिन्नसांची रेलचेल असलेलं गार्निशिंग केलेली, बघताच जिभेला पाणी सुटेल अशी भेळ दोन डिशमध्ये समोर आली. मी दोन्ही डिश घेऊन बाहेर आई जिथे बसली होती तिथे पोचलो. एक डिश तिच्या हाती देऊन बाजूच्या खुर्चीवर आसनस्थ झालो.

भेळ खरचं छान जमली होती. भेळ खाताखाता आम्ही आजूबाजूला रस्त्यावर काय चालू आहे ते बघत होतो. वर्दळ जशीच्या तशी होती. महिला-पुरुष सर्व कसल्यातरी घाई-गडबडीत चालले होते. प्रत्येकाला पुढे जायची घाई आणि त्यातून त्यांचा आणि इतरांचा उडलेला गोंधळ. काही शिस्तबद्ध तर काही बेशिस्त वाहनचालक. आमच्या समोर दुकानाच्या पायऱ्यांच्या बाजूला एक महिला तिच्या दोन मुलांसह बसली होती. पतीराज बहुदा भेळ घ्यायला दुकानात गेले असावेत. ती मस्त मुलांबरोबर गप्पा मारत होती. तेवढ्यात तिचे पतीराज हातात २-३ प्लेट्स घेऊन आले. एक तिच्या हातात दिली आणि बाकी मुलांच्या हातात. परत आत गेले. ती महिला आणि मुल प्लेटमधील पदार्थ खाऊ लागले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. छान एन्जॉय करत होते ते. पतीराज परत आले. बसायला खुर्ची शोधायला लागले. एकही खुर्ची बसायला शिल्लक नव्हती. त्यांनी जरा इकडे-तिकडे बघितलं आणि बायकोला म्हणाले, "तू एक काम कर इकडे पायरीवर बस. मी खुर्चीवर बसतो." बायको हातातली प्लेट सांभाळत खुर्चीतून उठली आणि पायरीवर बसली. पतीराज खुर्चीत स्थानापन्न झाले. पायरीवरून अनेक लोक जात-येत होते, महिला थोडी अवघडून बसली होती. पतीराज मात्र हातातली प्लेट संपवण्यात मग्न झाले होते. त्यांची निम्मी प्लेट रिकामी झाली असेल तोच त्यांचा मोबाईल ओरडला. पतीराजांनी पुन्हा इकडे-तिकडे पहिले. आणि आपली प्लेट बायकोच्या हाती देत त्यांनी मोबाईल कानाला लावला. "हा..बोल.... नाही जरा बाहेर आल्तो. काय? अरे नाय आज महिला दिन हाये ना म्हनून बायकोला आनी मुलांना बाहेर घेऊन आल्तो." मी पायरीवर अवघडून बसलेल्या त्याच्या बायकोकडे आणि आरामात बसलेल्या त्याच्याकडे पाहिलं आणि माझी मान (मन) दुसरीकडे वळवली.

रस्त्यावर आता काही अंतरावर फुगे विकणाऱ्या महिला-मुली उभ्या होत्या. रंगीबेरंगी फुगे मनाला शांत करत होते. आनंद देत होते. मन वयानी लहान होत होते. माझ्या मागे बसलेल्या कुटुंबातील मुलांनी फुग्यांचा हट्ट सुरु केला. त्याच्या आईने एका फुगेवालीला बोलावले. साधारण १४-१५ वर्षांची ती मुलगी पुढे आली. कळकट्ट, धुळीने माखलेले कपडे, विस्कटलेले अस्ताव्यस्त केस, भुकेने अशक्तपणाने पांढरे झालेले डोळे आणि दिन हास्य. असा त्या मुलीचा अवतार होता. ती मुलगी फुगे दाखवू लागली. एक पाच रुपयाचा, एक दहा रुपयाचा तर एक वीस रुपयाचा. लाल, निळे, हिरवे असे तीन रंगातले फुगे तिच्याकडे होते. मुलांची आई तिच्याशी भाव करू लागली. विसचा फुगा दहा ला दे म्हणू लागली. त्यांचा हा संवाद चालू होता तेवढ्यात दुकानाच्या काउंटरवरील माणूस एकदम पुढे आला. "ए चल पुढे हो. इथे नको थांबू. चल जा पुढे. निघ. आणि परत नको येऊ. कटकट साली. रोजची कटकट झालीये." असे म्हणून फुगेवालीला हकलू लागला. ती मुलगी त्याला सांगू लागली, "दादा, या ताईंनी बोलावलं म्हणून आले." फुगे विकत घेणारी बाई गप्प. तो माणूस पुन्हा ओरडला, "ए, माहितीये चल हो पुढ. यांना सगळे फुकट हवे, येतात भिका मागायला" मुलगी घाबरली. थोडी मागे सरकली. तशी विकत घेणारी बाई म्हणली, "ए दे दहावाले दोन." दुकानातला माणूस पुन्हा काउंटरवर गेला. फुगेवालीन दोन फुगे दिले आणि वीस रुपये घेऊन ती आणि तिच्या बरोबरच्या इतर फुगेवाल्या पुढे गेल्या.

माझी भेळ संपली होती. मी समोरच्या पायरीवर बसलेल्या महिलेकडे, फुगे विकत घेणाऱ्या बाईकडे, दुकानाबाहेर फुटपथावर अनधिकृतपणे मांडलेल्या खुर्चीकडे आणि पाठमोऱ्या कष्टाळू फुगेवालीकडे बघत होतो.  मला कळतच नव्हते कोणाचे हात कष्ट करणारे आणि कोणाचे फुकटे. तेवढ्यात बाजूच्या खुर्चीवरची मुलगी कोणाशी तरी मोबाईलवर बोलताना म्हणाली, "अग, आज वूमन्स डे आहे नं म्हणून तो म्हणला चल पाणीपुरी खाऊ..."

मी आईला म्हणलो, "आजही महिला दीन आहे".

मी आणि आई उठून गाडीकडे चालायला लागलो....



7 comments:

मनीचा..... आवाज said...

सुंदर 😊

Unknown said...

Khupchan👍

Unknown said...

Khupchan👍

Unknown said...

Mast

abo-bder said...
This comment has been removed by a blog administrator.
abo-bder said...
This comment has been removed by a blog administrator.
pakescorts646 said...
This comment has been removed by a blog administrator.