“सचिन, अरे उद्याची तयारी कुठपर्यंत आली?”
“हो भाऊ झालीच”
“हं. बरं तू आणि बाकीची पोरं जेवलात न
पोटभर?”
“हो भाऊ जेवलो आम्ही”
“बरं मग. उद्या सकाळी लवकर कामाला लागा.
जे लोक बाहेर गावाहून येणार आहेत त्यांच्या चहा नाष्ट्याची सोय, जेवणाची सोय नीट करा. लोक चार वाजल्यापासून यायला लागतील, त्यांना पाणी वगैरे द्या. आपले लोक वेगवेगळ्या ठिकाणी मदतीला असुदेत. आणि काही लागल तर मला डायरेक्ट फोन कर. मी सहा वाजेपर्यंत येईन तोपर्यंत मैदान पूर्ण भरण्याची जबाबदारी तुझी. या सभेचा तू प्रमुख आहेस. चल ठेवतो आता. गुड नाईट!”
“गुड नाईट भाऊ!”
त्याने घड्याळात पाहिलं रात्रीचे अडीच वाजले होते. एवढ्या रात्री भाउंनी स्वतः आपल्याला फोन केला या जाणिवेनेच त्याची छाती अभिमानाने फुलली.
आपल्याला एक “नवी ओळख” मिळाली आहे असं त्याला वाटलं.
“चला रे आता झोपूया”, असं म्हणून तो स्वतःही स्टेजवरच्या एका कोपऱ्यात पहुडला.
सकाळी सहा वाजताच तो उठला. बाकीच्यांनाही उठवलं. जवळच्याच एका टपरीवर जाऊन सगळ्यांनी चहा घेतला. स्टेजच काम तसं होतच आल होतं. फुलांच्या माळांनी आता स्टेज सजवायचे होतं, बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांच्या चहा-नाष्ट्याची सोय बघायची होती, स्टेजवरच्या मान्यवरांचे यथासांग स्वागत करण्यासाठी वेगवेगळ्या माणसांना नेमायचे होते, त्यानंतर दुपारच्या जेवणाची सोय बघायची होती…
तो सगळं मन लावून करत होता. भाऊंनी या सभेची पूर्ण जबाबदारी आपल्यावर दिली आहे. आपणच या सभेचे प्रमुख नियोजक आहोत, असं भाऊ म्हणाले आहेत. म्हणूनच तर रात्री एवढ्या उशिरा भाऊंनी स्वतः आपल्याला फोन केला. आपल्यावर एवढी मोठी जबाबदारी भाऊंनी दिली आहे तर आपण ती व्यवस्थित पार पाडली पाहिजे आणि भाऊंचा विश्वास सार्थ ठरवला पाहिजे.
सतत वाजणारा फोन, येणाऱ्या लोकांचं स्वागत, त्यांची उठबस करता करता दिवस कसा संपला आणि संध्याकाळ कधी झाली हे त्याला कळलच नाही. आजची निवडणुकीची ही शेवटची सभा होती. परवा मतदान होते आणि त्यामुळेच या सभेला विशेष महत्त्व होते. स्टेज छान सजले होते. हवी तशी गर्दी जमली होती. मैदान पूर्ण भरले होते. आलेले मान्यवर वक्ते त्यांची त्यांची भाषणे करत होते. सगळ्यांना आतुरता होती ती भाऊंची.
साडेसहा झाले आणि भाऊ आले. भाऊंसाठी त्याने खास ढोल पथक बोलावले होते. भाऊ आल्या आल्या पथकाने वाजवायला सुरुवात केली. गर्दीतून त्याच्याच माणसांनी आधी आणि मग गर्दीने भाऊंच्या नावाचा जयघोष केला. भाऊ जिंकणार याची खात्रीच जमलेली गर्दी देत होती. भाऊंनी गर्दी पाहून सचिनच्या पाठीवर थाप मारली “भले शाब्बास! छान गर्दी जमली आहे” अस ते सचिनला म्हणाले. सचिनला ते पूर्ण मैदानच आपल्या मुठीत आल्यासारखे वाटले. थोड्यावेळाने भाऊ भाषणाला उभे राहिले. साधारण तास-दीड तास त्यांचे भाषण चालू होतं. भाषण झालं तसं सर्व मान्यवरांनी भाऊंच अभिनंदन केलं. भाऊ त्यांच्या गाडीकडे निघाले. सचिन त्यांना भेटायला गेला आणि भाऊंच्या अंगरक्षकांनी त्याला बाजूला केलं. भाऊ हसले. गाडीत बसले. सगळ्यांना हात केला आणि निघून गेले.
थोड्याच वेळात संपूर्ण मैदान रिकामे झाले. आता सचिन आणि त्याच्याबरोबरचे कार्यकर्ते, मांडव वाले एवढेच काय ते तिथे राहिले. सभा तर यशस्वी झाली होती म्हणून भाऊंशी बोलावं आणि त्यांना शुभेच्छा द्याव्या यासाठी त्यांन भाऊंना फोन केला. रिंग वाजत राहिली पण कोणीही फोन उचलला नाही. भाऊ कामात असतील म्हणून त्याने फोन ठेवून दिला. सगळी आवराआवर झाली आणि त्याचबरोबर ते सर्व भुकेने कासावीस झाले. रोज “जेवलात का?” म्हणून फोन करणाऱ्या भाऊंचा आज फोन आला नाही. ज्या हॉटेलात सोय केली होती तिथे गेल्यावर कळाले जेवणाची सोय कालपर्यंत होती. शेवटी तो आणि बाकीचे कार्यकर्ते एका वडापावच्या गाडीवर गेले आणि तिथे वडापाव खात होते.
पुन्हा एकदा भाऊंना फोन लावून बघावं म्हणून त्याने फोन लावला.
फोन उचलला गेला. भाऊंचा असिस्टंट बोलत होता,
“काय रे एवढ्या रात्री कशाला फोन केलास?”
“अंं... ते.., भाऊंशी बोलायचं होतं.”
“ही काय वेळ आहे का भाऊंशी बोलायची? भाऊ झोपलेत. उद्या फोन कर. चल ठेव आता.”
फोन कट झाला होता.
त्याला लक्षात आलं होतं आपलं काम झालंय. भाऊ पुन्हा पाच वर्षांसाठी झोपलेत. आपण पुन्हा एकदा कार्यकर्ते आहोत. कोणीही आपल्याला आता ओळखत नाही. आपली “ओळख” प्रचाराच्या शेवटच्या क्षणीच संपली आहे.
सकाळपासून आईचा चार-पाच वेळा फोन आला होता. कामाच्या गडबडीत त्याने तो कट केला होता. त्याने आईला फोन लावला. फोन लागला आणि पलीकडून आवाज आला, “सचिन, अरे बाळा जेवलास का रे?”
(यातील प्रसंग व सर्व पात्रे काल्पनिक असून, त्यांचा कोणत्याही अस्सल भाऊ, ताई, दादा, साहेब इत्यादी लोकांशी संबंध नाही. कृपया ओढूनताणून जोडूही नये. असे प्रसंग फक्त राजकारणातच येतात असे नाही तर कुठेही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात येत असतात.)
No comments:
Post a Comment